नवी मुंबई : राजेंद्र पाटील
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या पाच राज्यातील सुमारे 500 तरुणांना सैन्य दलात भरती करुन देतो, असे सांगून त्यांची 13 कोटी रुपयांची फसवणूक करणार्या हसन्नोद्दिन चाँदभाई शेख या सुभेदारांला पाचोरा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे एकामागोमाग एक कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. शेख याने पुण्यात राहणार्या एका निवृत्त लेफ्टनंट जनरलला 11 लाखाची ईटिऑस कार भेट दिली होती. ही कार पुणे कोंडवा येथील वॉटर एज सोसायटीतून पाचोरा पोलीसांनी शुक्रवारी जप्त केली आहे.
पाचोरा पोलीसांकडे शुक्रवारी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथील आठ तरुणांनी आणि जम्मू येथील तरुणांनी तक्रार दिली. शेख याने या आठ तरुणांकडून 25 लाख तर जम्मूच्या तरुणांकडून 34 लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे पैसे परत देण्यासाठी शेखने चेकही दिले आहेत तर काहींना नोटरी करुन दिली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या प्रकरणात सैन्यदलातील आणखी काही अधिकार्यांचा हात असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागपूर येथून सैन्यदलातील अधिकार्यांची अशा एका प्रकरणात चौकशी केली होती. त्यावेळीही सैन्यदलातील कर्मचारी आणि अधिकार्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.
मंगळवारी पाचोरा पोलिसांच्या तपास पथकाने नगर जिल्ह्यातील वाळकी येथील शेख याच्या राहत्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्याठिकाणी ओएफके (खडकी ) पुणे येथील सुमारे 60 मुलांची नावे असल्याची एक यादी, संयुक्त नियुक्तीची देण्यात आलेली ऑर्डर, कार, एअर पिस्टल, बंदुक, सहा काडतुसे, पैशांची नोंद असलेली डायरी, बँकेचे पासबुक, चेकबुक, सैन्यदलाचे ओळखपत्र, घर, शेतीचे उतारे आढळले. मात्र त्यांच्या बँक खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याने पोलीस चक्रावले. त्याने वाळकी गावात खरेदी केलेली चार एकर जमीन आणि दोन बंगले आहेत. नगरमध्ये एक बंगला आहे. तो सुभेदार शेखच्या नावावर आहे. त्याचा 180 बाय 30 जागेत पोल्ट्रिफार्म असून त्याठिकाणी 18 हजार पक्षी असल्याची माहिती पुढे आली होती.
पुणे कोंडवा परिसरात राहणार्या निवृत्त लेफ्टनंट जनरलला 28 डिसेंबर 2012 रोजी शेखने ईटिऑस कार भेट दिली होती. ही कार सुभेदार शेख यांच्या नावावर आहे. 2012 ते 2018 फेबु्रवारीपर्यंत ही कार फक्त 30 हजार किलोमीटर फिरली आहे. पाचोरा पोलीसांच्या तपास पथकाने पुणे येथील वॉटर एज सोसायटीमधून एमएच 14/ सीएम2812 शुक्रवारी जप्त केली. निवृत्त लेफ्टनंट जनरल हे कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनीअरिंगचे ( सीएमई) प्रमुख होते. पोलिसांनी या निवृत्त लेफ्टनंट जनरला 7 मार्च रोजी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगितले आहे.