Sun, Apr 21, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेत वाद उफाळला

शिवसेनेत वाद उफाळला

Published On: Aug 14 2018 1:46AM | Last Updated: Aug 14 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी 

शिवसेनेमध्ये गटबाजी नसल्याचे मातोश्रीतून नेहमीच छातीठोकपणे सांगण्यात येते. पण  ईशान्य मुंबईमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी, यामुळे सच्चा शिवसैनिक दुखावले गेले आहेत. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेनेत गटबाजीने जन्म घेतला नव्हता. पण अलीकडच्या काळात मुंबई शहरात सर्वच विभागात शिवसेनेचे दोन गट कार्यरत असल्याचे दिसून येते. ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला. पण दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.  

जगदीश शेट्टी यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासोबत चांगले संबंध असल्याच्या शेकडो तक्रारी दळवी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी केल्या होत्या. त्यामुळे शेट्टींची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे त्यांनाही पक्षातून काढण्यात आल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  गेल्या अनेक वर्षांनंतर शिवसेनेकडून पदाधिकार्‍यांवर हक्कालपट्टीची कारवाई करण्यात आल्याने गटबाजीला आळा बसेल, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे.