होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परीक्षेला गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

परीक्षेला गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:16AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील अकरा वाजता सुरू होणार्‍या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बंदचा फटका बसला. विद्यार्थ्यांचे झालेले हाल लक्षात घेवून विद्यापीठाने दुपारी बैठक घेवून या विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा देण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.

मुंबई विद्यापीठाने सकाळच्या सत्रात 4 परीक्षा तर दुपारच्या सत्रात 9 अशा एकुण 13 परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व परीक्षांना सुमारे 10 हजार विद्यार्थी बसणार होते. महाराष्ट्र बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेला पोहचात आले नाही. वाहतूकीच्या अडचणीमुळे काही विद्यार्थ्यांनाप परीक्षा देेताच आली नाही. विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने विद्यापीठाने सुटी जाहीर करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी मंगळवारी केली होती. मनविसे सुधाकर तांबोळी यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा असे पत्र दिले होते. स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे सचिन पवार यांनीही तशी मागणी केली होती. मात्र विद्यापीठाने हा निर्णय न घेतल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांना सोसावा लागला. मंगळवारी विद्यार्थ्यांची गैरहजेरी पाहून विद्यापीठाने तातडीने बैठक घेतली आणि परीक्षा पुन्हा देता येईल असे जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या व अन्य कारणाने परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशिर झाला त्या विद्यार्थ्यांना 1 तास परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यासाठी, तसेच उशीरा येणार्‍या विद्यार्थ्यांना तितकाच वाढीव वेळ देण्यात आला. तर दुपारच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही त्यांना  पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली आहे. या संदर्भातील वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच नव्याने देण्यात येणार आहे.