Sun, Apr 21, 2019 14:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देहेरे आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

देहेरे आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:22AMजव्हार : वार्ताहर

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील देहेरे आश्रमशाळेत सातवीच्या विद्यार्थीनीने 26 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या शाळेच्या आवारातील शौचालयात नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. 

देहेरे आश्रमशाळेत सातवीत शिक्षण घेणारी सुमित्रा शिवराम हिरकुडा (वय 13) तिलोंडा गावातील आहे. 21 जानेवारी रोजी ती शाळेत अर्ज देवून घरी गेली. नंतर ती सहा दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी रोजी 2 .30 च्या दरम्यान शाळेत परत आली. शौचालयात कपडे धुते असे मैत्रिणींना सांगून ती शौचालयात गेली. कपडे धुवायला गेलेली सुमित्रा  दीड तास झाला तरी शौचालयातून बाहेर येत नसल्याने तिच्या मैत्रिणी बाहेरुन आवाज देवू लागल्या. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मागच्या खिडकीतून पाहिले असता ती लटकत असलेली दिसून आली. 

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी मान्यवर तसेच ग्रामस्थांची शाळेत मोठी गर्दी झाली होती. प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे आटपायला दुपारचा दीड वाजला. या गडबडीत सुमित्रा हिरकुडा ही शाळेत कधी आली हेच कळले नाही. मृतदेह शौचालयात लटकलेला पाहिल्यावर ती आजच घरुन आल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले.  मात्र शाळेत आल्यावर तिने  शाळेत आल्याची नोंद का केली नाही ? तसेच तिला शाळेत कोणी सोडले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक डी. पी. भोये हे  करत आहेत.