Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  टँकरच्या धडकेत विद्यार्थी ठार

 टँकरच्या धडकेत विद्यार्थी ठार

Published On: Dec 13 2017 2:36AM | Last Updated: Dec 13 2017 1:48AM

बुकमार्क करा

विरार : वार्ताहर

शाळेत जाण्यासाठी पाच मिनिटांचा झालेला उशीर एका 10 वर्षीय चिमुरड्याच्या जीवावर बेतला. टँकरची धडक आणि रुग्णालयांच्या टोलवाटोलवीने त्याचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नालासोपारा पश्चिमेत राहणारा निषाद गोविंद घाडी हा विद्यार्थी छेडा नगरातील यश कीर्ती विद्या मंदिरात शिकत होता. शनिवारी त्याला शाळेत सोडण्यासाठी त्याचे वडील गेले. मात्र, 5 मिनीटे उशीर झाल्यामुळे त्याला शाळेत प्रवेश दिला नाही. त्यामुळे गोविंद घाडी यांनी त्याला आपल्या सोबत घेतले. ते दोघेही दुचाकीवरून पूर्वेला गेले. तेथे रस्त्यावर निषादला दुचाकीसोबत थांबवून ते समोरच्या दुकानात मालाची डिलिव्हरी देण्यासाठी गेले. दरम्यान, भरधाव टँकरने निषादला जोरदार धडक दिली. ही घटना पाहणार्‍या पादचार्‍यांनी गलका करून टँकरचालकाला पकडून ठेवले. या घोळक्यातून वाट काढत गोविंद घाडी आपल्या दुचाकीजवळ पोहोचले असता, निषाद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळला. त्यांनी ताबडतोब निषादला उपचारासाठी जवळच्या लक्ष्मी नारायण रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचार न करता त्याला विजयनगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

पालिका रुग्णालयात निषादला दाखल केल्यानंतर तेथेही त्यांना दंडवते रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. दंडवतेंनीही उपचार न करता रिद्धी विनायक रुग्णालयात नेण्याचा सल्ला घाडी यांना दिला. सकाळी 10 वाजता जखमी झालेल्या निषादवर उपचार करण्यासाठी त्याचे वडील वेड्यासारखे भटकत होते. दुपारी अडीचपर्यंत त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने निषादची प्राणज्योत मालवली. या  प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. 

निषादचा बळी नेमका कोणी घेतला ? 5 मिनीटांचा उशीर झाल्यामुळे निषादला प्रवेश नाकारणारी शाळा, बेताल टँकरचालक की त्याच्यावर उपचार करण्यात स्वारस्य न दाखवणारी रुग्णालये? हा सवाल विचारला जात आहे.