Mon, Jun 17, 2019 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत दप्‍तर झाले हलके!

मुंबईत दप्‍तर झाले हलके!

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:09AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

यंदाच्या शैक्षणिक वर्षात मुंबई आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्‍तराचे ओझे कमी झाले असले तरी रायगडमधील निम्म्याहून अधिक विद्यार्थी अजूनही जड ओझे वाहत आहेत.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्‍तराचे ओझे वय आणि इयत्तानुसार निश्‍चित करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना शाळेत दिली जाणारी पुस्तके, वह्या, डबा, पिण्याच्या पाण्याची बॉटल यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढते का? पुस्तकांव्यतिरिक्त काही पुस्तके पालकाकडून दिली जातात की शाळांचा आग्रह असल्यामुळे दाप्तारचे ओझे वाढते. हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांकडून दप्‍तरांच्या ओझ्याचे अहवाल शिक्षण विभागाने मागविले होते. मुंबईतील शिक्षण निरीक्षक आणि ठाणे, रायगड येथील शिक्षणाधिकार्‍यांचे दप्‍तराचे ओझे तपासणीचे अहवाल यंदा नुकतेच दाखल झाले आहेत. या अहवालातील आकडेवारी पाहता अखेर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले आहे. 

शिक्षण उपसंचालकांच्या अहवालानुसार दक्षिण मुंबईतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी असणारे विद्यार्थी 95.16 टक्के आहेत. तर दप्‍तर जास्त असणारे विद्यार्थी 4.84 टक्के मिळाली आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत शिक्षण विभागाकडून मुंबई शिक्षण उपसंचालक विभागातील मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील एकूण 3613 शाळांपैकी 1117 शाळांतील 11587 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे शासनाने नमूद केलेल्या नियमावलीत आणि मर्यादेत बसणारे होते तर8260 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्या मर्यादेपेक्षा अधिक होते. हे प्रमाण रायगडमध्ये अधिक आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे हे त्याच्या वजनाच्या 10 टक्के इतके असावे. उत्तर मुंबईच्या शाळांतील तपासणीत 16 टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यात हे वजन जास्त आढळून आले आहे. या उलट दक्षिण मुंबईतील केवळ 4. 84टक्के विद्यार्थ्यांचे वजन अधिक मिळाले. पश्चिम मुंबईतील 14 टक्के विद्यार्थी अजून दप्तराच्या ओझ्याखाली असल्याचे तपासणी अहवालातील आकडेवारीवरुन स्पष्ट होते.