Wed, Jan 23, 2019 06:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुर्गम भागात प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ

दुर्गम भागात प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:10AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

जव्हारसारख्या आदिवासी पाड्यातील तिसरीत शिकणार्‍या फक्त 32 टक्के विद्यार्थ्यांनाच जोडाक्षरे वाचता येतात तर कर्नाटकच्या यादीगर येथे हेच प्रमाण अवघे 22 टक्के असल्याचे वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. राज्यातील शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या वंचीत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टाटा ट्रस्ट व आझीम प्रेमजी युनिर्व्हिसिटीतर्फे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तालुक्यांतील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थी आणि त्यांना शिकविणारे शिक्षक यांचा एक लिटरसी रिसर्च इन इंडियन लँग्वेजेस अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. या अहवालाच्या माध्यामतून पहिली ते तिसरी या तीन वर्षात कन्नड आणि मराठी या भाषांतील मुलांच्या साक्षरतेचा अभ्यास करण्यात आला.

पालघरच्या जव्हार तालुक्यातील तिसरीच्या विद्यार्थ्यांपैकी 78 टक्के विद्यार्थ्यांना मुळाक्षरे वाचता आली तर 56 टक्के विद्यार्थ्यांना मात्रा ओळखता आल्या आहेत. तिसरीत शिकणार्‍या 28 टक्के विद्यार्थ्यांना पहिलीच्या पुस्तकातील उतार्‍याचे वाचन करता आले नाही. तर दुसरीच्या पुस्तकाचे वाचन करताना तब्बल 46 टक्के विद्यार्थी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. शब्दांच्या वाचनाच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र या अहवालातून समोर आले आहे. भाषा आणि लिहिण्या-वाचण्याबाबत मुलांना शिकविण्याइतपत शिक्षक सक्षम नाहीत, असे चित्र असल्याचे अहवालात म्हटले आहे.

प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतरही शिक्षणातील मुलभूत कौशल्ये अंगिकारण्यात मुले कमी पडत आहेत, हे सर्वज्ञात आहे. लिहिताना आणि वाचताना ते समजून घेण्यात मुले असक्षम का ठरत आहेत, याची कारणे भारतातील शाळांमध्ये समजून घेतली जात नाहीत अथवा शिकवली जात नाहीत. अभ्यासक्रम, शिक्षकांची तयारी आणि शिकवण्याच्या प्रक्रियेतील अंतर कमी करण्यास आता शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे टाटा ट्रस्टच्या शिक्षण प्रमुख अमृता पटवर्धन यांनी सांगितले.