Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी कडवा संघर्ष

मराठा आरक्षणासाठी कडवा संघर्ष

Published On: Apr 29 2018 2:39AM | Last Updated: Apr 29 2018 2:23AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढले, तरी सरकार दखल घेणार नसेल, तर आता मराठा समाजाचीही सहनशीलता संपली आहे. त्यामुळे सरकारला कोणताही कालावधी न देता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी  कडवा संघर्ष करण्याचा, अचानक आंदोलन करण्याचा निर्धार मराठा  क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमताने व्यक्‍त करण्यात आला. वंजारी व धनगर समाजाला जसे एका दिवसात आरक्षण दिले, त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली. 

सरकारशी यापुढे कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिकाही जाहीर करून सरकारने मराठा समाजासाठी जे सात जी. आर. काढल्याचा दावा केला, तो खोटा असल्याचे सांगून सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत, हे जी.आर. फाडून टाकण्यात आले. तर मराठा चळवळीत फूट पाडण्याचे काम महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे करत असून, त्यांना उपसमितीतून हटविण्याची मागणी करण्यात आली. मराठा समाज आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्धार व्यक्‍त करण्यात आला.

मराठा समाजाची सहनशीलता संपली

मराठा समाजाची सहनशीलता संपल्याचे सांगून आबासाहेब पाटील यांनी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची जी उपसमिती आहे, त्यामध्ये केवळ चार-पाच जिल्ह्यांतील लोकांचा समावेश असून, मराठा समन्वयक या नावाने वावरणारे ते समाजाचे नेते  नसल्याचे सांगितले.

सरकारची इच्छाशक्‍ती नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्‍तीच नसल्याचा आरोप करून आबासाहेब पाटील यांनी, सरकारला केवळ सहा महिने झुलवत ठेवायचे असल्याचे सांगून, सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्वेक्षणाच्या नावाखाली वेळ काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगून पाटील यांनी, धनगर व वंजारी समाजाला ज्याप्रमाणे असल्या कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय आरक्षण लागू करण्यात आले, त्याच धर्तीवर मराठा समाजालाही आरक्षण लागू करण्याची मागणी केली.

उपसमितीने चळवळ फोडली

प्रा. माणिकराव शिंदे म्हणाले, आता सरकारलाही ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन करण्यात आली, या समितीने चळवळ फोडण्याचेच पाप केले आहे. या चर्चेत सहभागी होणार्‍यांपैकी काहींनी तुकडे गिळले आहेत. 

महेश डोंगरे यांनी, ङ्गखोटं बोल; पण रेटून बोलफ, असा कारभार सध्या सुरू असल्याचे सांगितले. बन्सी डोके यांनी वसतिगृह नसल्याने विद्यार्थ्यांना जो भत्ता दिला जातो, तो सरमहा 833 रुपये होतो, यामध्ये शहरात राहणे शक्य नसल्याचे सांगितले. संतोष सूर्यराव यांनी, राणे समितीच्या अहवालावर आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता वेळकाढूपणा चालू असल्याचा आरोप केला.
सरकारकडून लाखाचे आमिष दाखविल्याचा आरोप

ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी, सरकारडून आपल्याला लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोपही केला. ज्ञानेश्‍वर कवडे, अनिल देशमुख, युवराज सूर्यवंशी, किरण घोडके, सुनील बोडके, आशा शेकदार, केदार सूर्यवंशी, दिलीप गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. यावेळी आंदोलनासंबंधी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर आंदोलन करण्यासाठी व आंदोलनाबाबतचा निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली, ती पुढीलप्रमाणे : आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, प्रा. माणिकराव शिंदे, महेश डोंगरे, अ‍ॅड. संतोष सूर्यराव, बन्सी डोके, अंबादास काचोळे, युवराज सूर्यवंशी, केदार सूर्यवंशी, संजय सावंत, दिलीप गायकवाड, भरत पाटील व सुरेश पाटील.

Tags : Mumbai, mumbai news, Maratha Reservation, Struggle,