Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आजपासून कडक कारवाई

मुंबईत आजपासून कडक कारवाई

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

सोमवारपासून प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  प्लास्टिकबंदीचा हॉटेल व्यावसायिक, भाजी, मटण, चिकन विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. पर्यावरणाचा विचार करून राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोल बंदी लागू करण्यासाठी  काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक व थर्माकोल बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकाच्या हातात बंदी असलेली कॅरीबॅग आढळल्यास पाच हजार रु. दंड, तर विक्रेत्याला पहिल्यावेळेस पाच हजार, दुसर्‍यावेळी नियमभंग केल्यास 10 हजार रु. दंड, तर तिसर्‍या वेळी बंदी मोडल्यास 25 हजार रु. दंड ठोठावला जाईल. तसेच विक्रेत्यास तीन महिने कारावास शिक्षा होऊ शकते.
सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. प्लास्टिकबंदीनंतरच्या दुसर्‍या दिवशीही मुंबई शहर आणि उपनगरांत नागरिकांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. किरकोळ व्यापारी आणि लहान विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून आली. अनेक लहान व्यापार्‍यांच्या धंद्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले.      
प्लास्टिकबंदीचा फटका सध्या सर्वात जास्तकरून मांस आणि मासे विक्रेते, दूध पुरवठादार, वडापाव विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, डोसा सेंटर यांना बसला आहे.  या ठिकाणाहून कोणतीही वस्तू खरेदी करण्याची ठरल्यास ते नेमकी घेऊन कशात जायची असा प्रश्‍न व्यावसायिकांसोबत ग्राहकांना देखील पडलेला आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीच्या निर्णयाच्या दुसर्‍या दिवशीही सगळीकडे संभ्रम, गोंधळ आणि वैतागलेली जनता दिसून आली. तर काहींनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत जरी केले असले तरी प्लास्टिकबंदीचा फटका अप्रत्यक्षपणे आपल्याच खिशाला बसणार आहे या भीतीने हैराण झाल्याचे चित्र आहे.

प्लास्टिकबंदीनंतरच्या पहिल्याच रविवारी मांसाहाराचा बेत आखणार्‍या मुंबईकरांची मात्र चांगलीच पंचाईत झाली. सकाळी सकाळी मासळी बाजार आणि चिकन, मटणाच्या दुकानांपुढे गर्दी होती, प्लास्टिकबंदीची कल्पना असलेल्यांनी घरातून निघतानाच कापडी पिशव्या, डबे सोबत आणले, त्यामुळे त्यांची गैरसोय टळली, दादर पश्‍चिमेला काही ठिकाणी चिकन शॉपवाल्यांनी आपल्या ग्राहकांसाठी खास पळसाच्या पानांमध्ये चिकन बांधून देऊन ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र प्लास्टिकबंदीची पूर्ण कल्पना नसलेल्या काही मंडळींना मात्र विक्रेत्यांनी पिशवी न दिल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांना चिकन न घेताच घरी परतावे लागले. आता यापुढे दररोज चिकन, मासे, मटण घेताना घरातून डबे आणावे लागणार हे निश्‍चित. शिवाय काही चिकनविक्रेते अजूनही प्लास्टिकच्या पिशवीतूनच ग्राहकांना चिकन देत असल्याचे रविवारी पाहायला मिळाले.

अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे डोसा, इडली पार्सलसाठी फोन खणाणले; मात्र सांबर आणि चटणी कशात बांधून द्यायची हा यक्ष प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने त्यांनी पार्सल देण्यास नकार दिला. परिणामी धंद्याचेही नुकसान होत असल्याचे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला पदपथावर अनेक वडापावच्या गाड्यांवरसुद्धा वडा, समोसा, भजी कागदात बांधून देण्याचा मार्ग निवडण्यात आला. पण पातळ चटणी नेमकी कशात बांधून द्यायची या विचाराने वडापाव विक्रेते गोंधळून गेल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले.