Sun, Jul 12, 2020 20:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई उपनगरांत तणावपूर्ण परिस्थिती

मुंबई उपनगरांत तणावपूर्ण परिस्थिती

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 1:12AM

बुकमार्क करा
घाटकोपर : वार्ताहर

भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी झालेल्या दगडफेकीचा निषेध करत आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याने मंगळवारी दिवसभर मुंबई उपनगरात तणावपूर्ण परिस्थिती होती. सोमवारी रात्रीपासून नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोठा पोलीस बंदोबस्त जागोजागी होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले होते.

सोवारी रात्री साकीनाका एल.अ‍ॅण्ड टी.स्टॅण्डजवळ आंदोलकांनी रास्ता रोको केला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच  चेंबूर, गोवंडी, टिळकनगर, घाटकोपर, असल्फा,  रमाबाई नगर, मुलुंड , आदी विविध ठिकाणी संतप्त समुदाय रस्त्यावर उतरला होता.  दुकाने बंद करून रास्ता रोकोचा प्रयत्न केला. चेंबूर रेल्वे स्थानकात अर्धा तास रेल रोको आंदोलन करण्यात आले. 

जय भीमचा नारा देत अल्पवयीन मुलांसह आंबेडकरी जनता चेंबूर नाक्यावर उतरली होती. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांची होती. वृत्तांकन करण्यासाठी  आलेल्या पत्रकारांना देखील लक्ष करण्यात आले. चेंबूर नाक्यावर शंभर पोलिसांची कुमक असताना अचानक हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली.  रस्त्यावरील चालत्या वाहनांचे, पोलिसांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले. 

घाटकोपरच्या भीमनगर, असल्फा आणि एलबीएस मार्गावर देखील रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला.  चेंबूर पी.एल. लोखंडे मार्गावर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. यात छायाचित्रकार महेश पोळ यांच्या पायाला जखम झाली आहे. 

काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वातावरण अधिकच तापत असल्याने काही शाळा सोडण्यात आल्या. सुंदरबाग आणि भीमनगर येथून आलेल्यांनी  एलबीएस मार्गावरील फिनिक्स मॉल येथील काही पार्क करण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या जमावाकडे धारधार शस्त्रे सुद्धा होती.