होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेच्या ३,८२० कर्मचार्‍यांचे वेतन रोखले

पालिकेच्या ३,८२० कर्मचार्‍यांचे वेतन रोखले

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:31AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेत बायोमेट्रिक हजेरी सुरु करण्यात आली आहे. मात्र मनपा प्रशासनातील 3 हजार 820 कर्मचार्‍यांनी ती चुकवली असून, त्या त्या दिवशी त्यांची गैरहजेरी नोंदली गेली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांचा पगार रोखून ठेवण्यात आला आहे. 

मनपा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच बायोमेट्रिक हजेरी सुरु केली होती. मात्र अनेक कर्मचार्‍यांनी त्यासाठी नोंदणी करण्याची तसदीही घेतली नव्हती. वारंवार सूचना करुनही अनेक अधिकार्‍यांनी नोंदणी केली मात्र त्यावर नोंदणी करण्यास कुचराई केली होती. अशा कर्मचार्‍यांवर आता कारवाईची कुर्‍हाड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेत 1 लाख 2 हजार कर्मचारी विविध विभागांत कार्यरत असून, त्यांची हजेरी नोंदण्यासाठी मनपा प्रशासनाने तीन हजार बायोमेट्रिक यंत्रे बसविली आहेत. या कर्मचार्‍यांचे वेतनही त्या हजेरीशी ऑटो लिंक करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याच्या कामासाठी शहराबाहेरील तलावक्षेत्रात नियुक्‍त करण्यात आलेल्या 400 कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी सक्‍तीतून वगळण्यात आले आहे. ज्या तीन हजार 820 कर्मचार्‍यांचे वेतन रोखून धरले आहे, अशा फायरमन, सुरक्षा रक्षक, अभियंते, कारकून आणि स्वीपर अशा कर्मचार्‍यांनी आता विविध सबबी घेऊन अधिकार्‍यांकडे खेटे घालण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक ड्युटीवर होतो, कामाच्या ठिकाणापासून लांब होतो, अशा सबबी सांगितल्या जात आहेत. 

कर्मचार्‍यांनी बायोमेट्रिक यंत्रावर हजेरी नोंदवली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय सिंघल यांनी सांगितले. मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी कामावर दांड्या मारत होते. मात्र त्यांचा पूर्ण पगार दिला जात होता. वरिष्ठ अधिकार्‍यांशी तडजोडी करुन हजेरी पत्रक भरले जात असल्याचे निदर्शनास आले होते. फील्डवर असलेले स्वीपर्ससारखे कर्मचारी प्रॉक्सीजच्या माध्यमातून आपली हजेरी भरत होते. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात ए वॉर्ड (सीएसटी, चर्चगेट, कुलाबा, कफ परेड) मध्ये बायोमेट्रिक हजेरी नोंदवलेल्या मात्र प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर नसलेल्या 12 सफाई कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले.