Wed, Jan 16, 2019 15:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावत्र मुलाला पित्याच्या संपत्तीत हिस्सा नाही

सावत्र मुलाला पित्याच्या संपत्तीत हिस्सा नाही

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

सावत्रपुत्राने पित्याच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी इतर वारसांबरोबरच आपलेही नाव सरकारी दफ्तरात(रेकॉर्ड) लावण्यात यावे, अशी केलेली मागणी उच्च न्यायालयाच्या एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सावत्र पुत्र मृताचा नातेवाईक नसून हा दावाच पूर्वग्रहदुषित असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. 

खटला दाखल करणार्‍या पुत्राच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अन्य नातेवाईकांबरोबर आपलेही नाव सरकारी दफ्तरामध्ये नोंद करण्यात यावे, अशी भूमिका या पुत्राने घेतली होती व त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु, तो मृत व्यक्तीचा रक्तसंबंधी नसल्याने हिंदु वारसाहक्क कायद्यानुसार तो मृताचा वारस होऊ शकत नाही, तसेच सदर पुत्राचा दावा हा पूर्वग्रहदुषित असल्याचे सांगून न्यायालयाने ही याचिका निकाली काढली आहे. 

सदर सावत्र पुत्राच्या ताब्यात संबंधीत मृत पित्याची एक नवांश मालमत्ता आहे. त्यामध्ये तीन इमारतींच्या पुनर्विकासाच्या मालमत्तेचाही समावेश असून त्याबाबत कायदेशीर लढा सुरू होता. सदर संपत्तीमध्ये आपलाही कायदेशीर वारस म्हणून समावेश व्हावा अशी या सावत्रपुत्राची मागणी होती. 

पारंपरिक मालमत्तेमध्ये हा पिता अर्ध्या हिस्स्याचा मालक होता. त्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसांचे नाव दफ्तरात नोंद करण्यात आले. मात्र, सावत्र पुत्राची नोंद न करण्यात आल्याने त्याने सन 2000 मध्ये हा दावा दाखल केला होता. हा खटल्याची सुनावणी इनकॅमेरा झाली.