Wed, Mar 27, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्टेम सेल थेरपी आता येणार कायद्याच्या कक्षेत?

स्टेम सेल थेरपी आता येणार कायद्याच्या कक्षेत?

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:04AMमुंबई : प्रतिनिधी

देशभरात मोठ्या प्रमाणावर स्टेम सेल थेरपीचा वापर डॉक्टरांकडून केला जातो. पण, लवकरच स्टेम सेल थेरपी कायद्याच्या कक्षेत येणार आहे. केंद्र सरकार स्टेम सेलला ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक कायद्याच्या कक्षेत आणणार असून यासाठी आरोग्य मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. 

देशात अनेक डॉक्टर स्टेम सेल थेरपीच्या मदतीने लोकांवर उपचार करतात. मेंदूचे आजार, कॅन्सर, स्नायूंचे आजार, रक्ताचे विविध आजार या सारख्या आजारांवर स्टेम सेल थेरपीने उपचार करण्यात येतात. स्टेम सेल थेरपीवर देशात कोणताही अंकुश नव्हता. त्यामुळे बेसुमार पद्धतीने याचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे या पद्धतीवर अंकुश आणण्याचा केंद्र सरकारने विचार सुरू केलाय. 

केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे. स्टेम सेल थेरपीला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक कायद्यात आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे डॉक्टरांना आता नक्की काय करायचे याची माहिती मिळेल, केंद्राच्या कायद्यानंतर यात गोंधळाची परिस्थिती राहणार नाही, असे देशातील स्टेम सेल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी म्हणाले.

बाळाच्या जन्माच्या वेळी नाळेतून किंवा मणक्यातून बोन मॅरो पद्धतीने स्टेम सेल मिळवता येतात. देशभरातील अनेक ़डॉक्टर स्टेम सेल पद्धतीने आजारावर उपचार करतात. मात्र, यावर सरकारने निर्बंध घालावेत, अशी मागणी गेली कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेम सेल थेरपीवर संशोधन करण्यासाठी एक कमिटी गठीत केली होती. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने 2017 मध्ये स्टेम सेलबाबत काही शिफारसी केंद्र सरकारला दिल्या होत्या.

स्टेम आरएक्समधील रिजनरेटिव्ह मेडिसीनचे रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितले की, स्टेम सेल थेरपी असाध्य आजारांनी ग्रस्त असणार्‍या रुग्णांवर केली जाते. स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून रुग्णांच्या शरीरावर उपचार करता येतात. 

Tags : Mumbai, Stem Cell Therapy, law, Mumbai news,