ठाणे : खास प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व संलग्न ठाणे जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प सुरू केले असून त्यातील 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या ठाणे जिल्ह्यात सुरू आहेत. तथापि हे प्रकल्प पूर्ण करताना स्थानिक भूमिपुत्रांना, या प्रकल्पांमुळे बाधित होणार्यांना त्वरित न्याय देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जिल्ह्यातील मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील घणसोली तळवली उड्डाण पूल, महापे भुयारी वाहन मार्गिका व सविता केमिकल येथील उड्डाणपूल उद्घाटन, ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणारा रस्ता आणि ठाण्यातील कोपरीच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी ऐरोली आणि कोपरी येथे झाले. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. राजन विचारे, खा. कपिल पाटील, सर्वश्री आ. मंदाताई म्हात्रे, किसन कथोरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, सुभाष भोईर, संदीप नाईक, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, महापौर मीनाक्षी शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजू, अति. महानगर आयुक्त प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील या भागात रहदारीच्या कोंडीची मोठी समस्या होती. ही समस्या या नवीन प्रकल्पांमुळे संपुष्टात येऊन सुरळीत अडथळाविरहित वाहतुकीची अनुभूती नागरिकांना घेता येईल. नव्या तंत्रज्ञानाने उड्डाणपूल उभारणी ही वर्षभरात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे लवकर या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होतील. या शिवाय या भागात मेट्रो वाहतुकीचे जाळे विकसित करण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक मोठे मेट्रो नेटवर्क सध्या ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येत असून येत्या 2 ते 3 वर्षात ही सर्व कामे पूर्ण झालेली असतील.
मुंबई परिसरातील कोणत्याही एका भागातून दुसर्या भागात तासाभरात पोहोचता येईल, अशा रस्ते व दळणवळणाच्या पायाभूत सुविधा निर्मितीस चालना दिली जात आहे. यात जलमार्गाचाही वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक ठाणे जिल्ह्यातून होत असते. या वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून रोरो जलसेवा सुरू करण्याचेही प्रस्तावित आहे. याशिवाय शासन किनारी मार्गाच्या प्रस्तावाचीही तपासणी करीत आहे. या सर्व कामांमधून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही लोकाभिमुख संस्था म्हणून पुढे येत आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात निर्माण होणार्या सुविधांची कामे अधिकाधिक जलद होऊन जिल्हावासीयांना त्यांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते अधीक्षक अभियंता शरद वरसाळे, कार्यकारी अभियंता मिलिंद जैतपाल, उपअभियंता गुरुदत्त राठोड , अमोल खैर यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरआयुक्त आर. ए. राजू यांनी केले. त्यात आगामी काळात करावयाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. आभारप्रदर्शन अति. महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी केले.