Tue, Jan 21, 2020 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चूल, धूरमुक्‍तीसाठी राज्याची स्वतंत्र गॅस जोडणी योजना

चूल, धूरमुक्‍तीसाठी राज्याची स्वतंत्र गॅस जोडणी योजना

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

चूल व धूरमुक्‍त राज्यासाठी सरकारने राज्यातील बिगरगॅस जोडणी धारकांसाठी स्वतंत्र गॅस जोडणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असून, शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारची उज्ज्वला योजना आणि विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 यांच्यासाठी असलेल्या निकषांमध्ये पात्र न ठरणार्‍या शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, अशी कुटुंबे अन्‍नसुरक्षा योजनेचे लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील राज्य शासनाच्या शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. ही गॅस जोडणी कुटुंबप्रमुख प्रौढ महिलेच्या नावाने मंजूर करण्यात येणार आहे. एक शिधापत्रिकाधारक कुटुंब एक गॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील. प्रत्येकी एक गॅस जोडणी वितरीत करण्यासाठी प्रतिजोडणी याप्रमाणे लागणार्‍या 3,846 रुपये खर्चाचा भार शासन उचलणार आहे. त्यासाठी 100 कोटी इतक्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे.