मुंबई : अवधूत खराडे
राज्याचे पोलीस महासंचालक महीनाअखेरीस निवृत्त होणार असल्याने राज्य पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात मुख्यत्वेकरून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे या पोलीस आयुक्तालयाच्या प्रमुखांसह राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) अशा महत्त्वाच्या पदांवरील प्रमुखांच्या बदल्या होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.
देशाची आर्थिक राजधानीचे शहर आणि मुंबई पोलीस दलाची जगविख्यात असलेली ख्याती यामुळे आयुक्त पद एकदा तरी भूषवावे अशी अनेक अधिकार्यांची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते. तर अनेकांच्या पदरी निराशा पडते. असे हे मुंबई पोलीस आयुक्तपद महिनाअखेरीस होणार्या पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या निवृत्तीमूळे रिक्त होणार आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालक पदाची सुत्रे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसगीकर यांच्या हाती देण्यात येणार असल्याने त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या सुबोध जैस्वाल यांना राज्य सरकारने परत बोलावले तर सेवाज्येष्ठतेनुसार ते या पदाचे दावेदार ठरतील. त्यांच्यापाठोपाठ राज्य गुप्तवार्ता विभागाचे काम बघत असलेल्या आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांचे नाव चर्चेत असून ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. या बदलीसोबतच ठाणे, नवी मुंबई, पुणे, एटीएस आणि एसीबी प्रमुखांच्या बदल्या होणार आहेत.आयुक्तांच्या बदल्यांसोबतच मुंबई पोलीस दलातील रिक्त असलेली अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग आणि नव्याने रिक्त होणार्या सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था पदावर वर्णी लावण्यासाठी काही अधिकार्यांनी फिल्डींग लावली आहे. गृहमंत्रालयात तसेच राज्य पोलीस मुख्यालयामध्ये याच्या हालचाली सुरू झाल्या असून बुधवारी रात्री पर्यंत हे काम सुुरू होते. येत्या दोन दिवसांत या बदल्या होणार असल्याने अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.