Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात ७० लाख क्विंटल तूर पडून, खरेदीदार मिळेना

राज्यात ७० लाख क्विंटल तूर पडून, खरेदीदार मिळेना

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 12:58AMमुंबई : चंदन शिरवाळे

मागील दोन वर्षांपासून सरकार खरेदी करत असलेली सुमारे 69 लाख 72 हजार 785 क्विंटल तूर विविध गोदामांमध्ये पडून असताना सरकारला मे 2018 अखेर आणखी 31 लाख 22 हजार क्विंटल तूर खरेदी लागणार आहे. ही तूर खरेदी केल्यानंतर राज्यात सुमारे 1 कोटी 45 हजार 785 क्विंटल तुरसाठा होणार आहे. तूर खरेदीला दक्षिणेतील राज्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे सरकारने आता

शेजारच्या गरीब देशांकडे विचारणा सुरु केली आहे. पण त्या देशांनीही गरजेनुसार अगोदरच तूर खरेदी केली असल्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणातील तुरीचे काय करायचे, असा प्रश्‍न सरकारला पडला आहे.

केंद्र सरकारने साठा करण्यास बंदी घातल्यामुळे राज्यात दोन वर्षांपुर्वी तुर दाळीची टंचाई निर्माण झाली होती. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले. मात्र, भाव गडगडल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होईल या भितीने सरकारने गेल्या वर्षी सुमारे 25 लाख क्विंटल तर नाफेडने 30 लाख क्विंटल तुर खरेदी केली होती. सरकारने खरेदी केलेल्या तुरीपैकी आता 19 लाख 14 हजार क्विंटल तुर शिल्लक आहे. 

यंदाही तुरीचे महाबंपर पिक आले आहे. व्यापार्‍यांनी कमी भावाने तुर खरेदी करु नये, यासाठी सरकारने आतापर्यंत 19 लाख 36 हजार 785 क्विंटल तुर खरेदी केली आहे. राज्यात 25 जिल्ह्यांमध्ये 4 लाख 14 हजार 844 शेतकर्‍यांनी तुरखरेदीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 54 हजार 637 शेतकर्‍यांकडुन तुर खरेदी झाली असुन अद्याप 2 लाख 54 हजार 265 जणांची 31 लाख 22 हजार क्विंटल तुर खरेदी करणे बाकी आहे. 

गेल्या वर्षी सरकारने हमीभावाने 78 लाख क्विंटल तूरीची खरेदी केली होती. यावर्षी तुरीची आधारभूत किंमत 5 हजार 450 रूपये असून राज्य सरकार यंदा केंद्र सरकारच्या किंमत समर्थन योजनेखाली तूर खरेदी करत आहे. 1 फेब्रुवारी 2018 पासून राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 189 ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. या खरेदीची मुदत 18 एप्रिल 2018 पर्यंतच होती. त्यामुळे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तुर खरेदीची मुदत आणखी वाढविण्याची विनंती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे. 9 एप्रिल रोजी याबाबत खोत यांनी दिल्लीला पत्र पाठविले आहे.

Tags : mumbai, mumbai news, tur, 70 million quintals,  fell,