Fri, Apr 26, 2019 17:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यभर प्लास्टिकबंदीची धडक कारवाई

राज्यभर प्लास्टिकबंदीची धडक कारवाई

Published On: Jun 24 2018 1:45AM | Last Updated: Jun 24 2018 1:34AMनवी मुंबई/मुंबई : प्रतिनिधी 

शनिवारपासून राज्यभर प्लास्टिकबंदीच्या धडक कारवाईला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी 14 महानगरपालिका व नगरपालिकांनी जबर दंडाच्या पावत्यादेखील फाडल्या. कारवाईच्या शुभारंभाचे बळी ठरले ते अर्थात व्यापारी. पहिल्या दिवशी सर्वाधिक दंड वसूल केला तो पुणे महानगरपालिकेने आणि दुसर्‍या क्रमांकावर राहिली ती नाशिक महानगरपालिका. पुण्यात 3 लाख 69 हजार रु.,  तर नाशिक महापालिकेने 72 जणांवर कारवाई करुन 3 लाख 60 रुपये दंड वसूल केला. सर्वात कमी दंड अहमदनगर पालिकेने 10 हजार रुपये वसूल करुन दोनजणांवर कारवाई केली. राज्यातील तेरा महापालिकांच्या हद्दीत प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी सुमारे 25 हजार किलोहून अधिक प्लास्टिक जमा करण्यात आले.सोमवारपासून  प्लास्टिकविरोधी कारवाई अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, भाजीमंडई, बाजार आदी परिसर कारवाईचे लक्ष्य असतील. 

कल्पना केली होती त्यापेक्षा प्लास्टिकबंदीची दहशत आता सुरू झाली आहे. नोटबंदीपेक्षाही ही बंदी अधिक तापदायक ठरणार असे दिसते. जुन्या नोटा बाळगल्या तर अटक होते तशीच कारवाई आता तुमच्याजवळ प्लास्टिक बॅग दिसली की होवू लागली आहे. बंदीच्या कारवाईची सुरुवात दुकानदारांपासून सुरू झाली असली तरी सोमवारपासून सामान्य ग्राहकही दंडाचा धनी होवू शकतो. 
प्लास्टीक वापरणार्‍यांना पाच हजार रुपयांच्या दंडाच्या पावत्या देण्यात येत असून त्यातून लाखो रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापूर्वी अनेकवेळा प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतला असला तरी तो टीकला नव्हता. मात्र, यावेळी राज्य सरकार प्लास्टीकवर बंदी घालण्यावर गंभीर असून पहिल्याच दिवशी धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. विविध महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रात प्लास्टीक वापरणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

ठाणे महापालिकेच्या पथकाने बाजारात अक्षरश: गस्त घालीत शहरात 100 हून अधिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून 95 हजारांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.  तर 2500 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.  ठाणे महापालिकेने यासाठी 10 प्रभाग समितीनिहाय 10 पथकांची स्थापना केली असून आजपासून हे 10 पथके प्लास्टिकचा वापर करणार्‍यांच्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. या प्रत्येक टीममध्ये स्वच्छता निरीक्षकाचा समावेश करण्यात आला असून विशेष करून ठाणे रेल्वे स्थानक आणि मार्केट परिसरात प्लास्टिकचा वापर करणार्‍यांच्या शोध घेतला जाणार असल्याची माहिती प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली आहे. 

नवी मुंबईत तर जाणार्‍या-येणार्‍या वाहनांचीही झडती घेऊन प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेण्यात आल्याने लोक चक्रावून गेले. एपीएमसी, वाशी, तुर्भे येथे भरारी पथकाने प्लास्टिक बंदीची झाडाझडती घेतली. नवी मुंबईत पालिकेच्या 55 भरारी पथकांनी आठ विभागात प्लास्टिक बंदीची कारवाई करत 35 हजार रुपये दंड वसूल केला. वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोलीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी 1 टन प्लास्टिकचे संकलन करण्यात आले. या कारवाईचा अहवाल सहायक आयुक्तांकडून पालिका आयुक्तांना दिला जाणार आहे. सोमवारपासून ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. 

अंबरनाथमध्ये नगरपरिषदेच्या कारवाईत 40 किलो प्लास्टिक  जप्‍त करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली. शहराच्या पुर्व भागातील ओवन पिक केक शॉप, श्रद्धा इंटरप्रायजेस, प्रकाश छेडा, श्रीरथ हॉटेल, महाविर इंटरप्रायजेस, हरिओम ज्युस सेंटर, अंबिका प्लास्टिक अश्या काही दुकान व हॉटेलवर कारवाई करुन प्लास्टिक बंदीचा दंड वसूल करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील प्लास्टिकच्या वस्तूंच्या होलसेल व्यापारी-विक्रेत्यांना यापूर्वीच बंदी असलेले प्लास्टिकच्या उत्पादने न बाळगण्याबाबत सूचना महापालिकेने दिल्या होत्या. त्यानुसार त्यांना दिलेल्या  तीन महिन्यांच्या मुदतीत त्यांनी बंदी असलेली प्लास्टिकची उत्पादन विक्री बंद केल्याचे सांगण्यात आले आहे.  प्लास्टिकवरील कारवाई यापुढेही दररोज सुरु राहणार असल्याची माहिती सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले.

उल्हासनगरमध्ये प्लास्टीक बनविण्याचे छोटे मोठे उद्योग आहेत. महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर प्लास्टीक बनविणार्‍या कारखान्यांवर कारवाई करीत 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी हे बाजारपेठेत प्लॅस्टिकची झाडाझडती घेण्यासाठी गेले असता, तेथील व्यापार्‍यांनी त्यांना नालेसफाईवरून घेरण्याचा प्रयत्न केला. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी करत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड केली. पण, प्लॅस्टिक बंदी आणि नालेसफाई हे भिन्न विषय आहेत. तीन दिवसांपूर्वीच प्रभाग 1 चा पदभार स्वीकारला. सोमवारी प्रभागात या तक्रारीचे निवारण करून देण्यात येणार, असे आश्वासन दिल्यानंतर व्यापारी निवळले आणि पथकासोबत प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईसाठी कामाला लागले.

भिवंडी महापालिकेनेही आठ जणांवर कारवाई करीत 40 हजार रुपयांचा दंड वसुल केला. 

नाशिक महापालिकेने 72 जणांवर कारवाई केली असून  या कारवाईत 3 लाख 60 हजारांचा दंड वसुल केला आहे. या कारवाईत सुमारे साडेतीनशे कीलो प्लास्टीकही जप्त करण्यात आले. तर, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच दिवशी 52 जणांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसुवल करण्यात आला. सांगली — मिरज — कुपवाड महापालिकेने पहिल्याच दिवशी कारवाई करीत सुमारे एक टन प्लास्टीक जप्त करीत दंडाची कारवाई केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेनेही प्लास्टिक विरोधात धडक कारवाई केली. महानगरपालिकेच्या विशेष पथकाने शहरातील मुख्य बाजार असलेल्या गोलबाजारात धाड टाकून अनेक दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त केले. महापालिका अधिकारी आणि दुकानदारांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग उद्भवले. अकोला, अहमदनगर, नांदेडमध्येही प्लास्टीक वापरणार्‍यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

नागपूर : महापालिकेने प्लॅस्टिक विरोधात धडक मोहिम राबवून 538.9 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करून 1 लाख 55,500 रुपयांचा दंड गोळा केला आहे. नागपूर महापालिकेने आज 10 झोनमध्ये कारवाई करून 538.9 किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या तर 34 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे

सांगलीत 4 ट्रक प्लास्टिक जप्‍त

सांगली : सरकारने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर शनिवारी सांगलीत पहिल्याच दिवशी प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम उघडण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांसह विविध प्रकारचा 4 ट्रक साठा जप्त करण्यात आला. व्यापार्‍यांना सुमारे 75 हजार रुपयांचा दंड झाला.