Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बनावट लाभधारकांना राज्य परिवहन महामंडळाचा चाप

बनावट लाभधारकांना राज्य परिवहन महामंडळाचा चाप

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:56AMठाणे : अनुपमा गुंडे 

बनावट दाखले आणि कागदपत्रांच्या आधारे एसटी प्रवासीसेवेचा लाभ घेणार्‍या बनावट लाभधारक प्रवाशांना आवर घालण्यासाठी तसेच सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी  अशी दोन प्रकारची स्मार्ट कार्ड राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ऑक्टोबरअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. एसटीच्या लाभार्थ्यांसाठी असणारे स्मार्ट कार्ड आधार कार्डाशी जोडलेले असल्याने बनावट लाभधारकांना आळा घालणे वाहकांना शक्य होणार आहे. 

राज्य शासनाच्या वतीने एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी- विद्यार्थिनी, अशा विविध 24 सामाजिक घटकांना प्रवासी तिकिटात सवलत देण्यात येते. ही सवलत 50 ते 100 टक्क्यांपर्यंत असते. या सवलतीचा लाभ वर्षाकाठी सुमारे 39 कोटी प्रवासी घेतात. परंतु अनेक सामाजिक घटकांच्या बाबतीत विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग खोटे दाखले देऊन, बोगस ओळखपत्र बनवून या सवलतीचा लाभ उठविला जात असल्याच्या तक्रारी  येत  होत्या. बर्‍याचदा वाहक (कंडक्टर) व असे बनावट सवलतधारक यांच्यात वाद-विवाद होऊन प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 

तसेच काही महिला व पुरुष वाहकांना मारहाणीला सामोरे जावे लागले आहे. बनावट सवलतधारकांच्या ओळखपत्राची अथवा सवलत कार्डची वैधता तपासण्याची कोणतीही यंत्रणा सध्या वाहकाकडे नसल्याने अशा  बनावट सवलतधारकांचा नाहक जाच वाहकांना सोसावा लागतो, यातून मार्ग काढण्यासाठी आणि अशा बनावट सवलतधारकांना कायमचा पायबंद घालण्यासाठी व वाहकांना यांच्या जाचातून मुक्त करण्याकरिता विविध सामाजिक घटकांच्या सवलतीसाठी स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. अर्थात हे स्मार्ट कार्ड लाभार्थीच्या थेट आधार क्रमांकाशी जोडण्यामुळे त्या लाभार्थीची अचूक माहिती  महामंडळाला उपलब्ध होणार आहे.

या कार्डामुळे पात्र लाभार्थींनाच सवलतीचा फायदा मिळणे आता शक्य होणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थिनी व इतर मासिक, त्रैमासिक पासधारकांना या स्मार्ट कार्डमुळे दरमहा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सोय असल्यामुळे त्यांचे दर महिन्याचे एसटी बसस्थानकावर जाऊन पास नूतनीकरण करण्याचे कष्ट वाचणार आहेत. सहाजिकच या स्मार्ट कार्ड योजनेमुळे बोगस सवलतधारकांना पूर्णविराम मिळून योग्य लाभार्थी प्रवाशांना सहज व सुलभरीत्या सवलत योजनेचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा महामंडळ प्रशासनाला आहे. महामंडळाच्या वतीने शहीद जवानांच्या पत्नींसाठी स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 500 शहीद जवानांच्या पत्नींना या सेवेचा लाभ देण्यात आल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.