Wed, Feb 26, 2020 10:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल!

मुंबई : आशीष शेलारांनी वाजवला ‘सामना’चा ढोल!

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 5:56AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गुजरातच्या मतमोजणीपूर्वी 24 तास अगोदर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातचे निवडणुकपूर्व अंदाज पटणारे नसल्याची टिप्पणी केली होती. मात्र मतमोजणीत गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलल्यानंतर भाजपाने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी सामना ढोलपथक आणून विजयाचा ढोल बडवला आणि घंटेवर हातोडा ठोकत शिवसेनेला चांगलेच खिजवले. तर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला आतातरी जाग येणार का, असा सवाल करीत गुजरातचा निकाल ऐकून तरी ते आता जमिनीवर यावेत, अशी प्रार्थना आपण देवाला करतो असा टोला लगावला आहे. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांतील विजयोत्सवाची भाजपाने रविवारी रात्रीपासून मुंबईत सुरुवात केली होती. त्यामुळे सकाळपासूनच भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत निकालाचे कल येण्यास सुरुवात होताच फटाके, ढोल-ताशे आणि विविध वाद्यांच्या गजरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीत भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयानजीकचा परिसर दणाणून सोडला. या जल्लोषात ‘सामना’अशी अक्षरे लिहलेले ढोल वाजविण्यात येत असल्याने सर्वांसाठीच हा कुतूहलाचा विषय झाला होता. 

या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी सर्व संकेत मोडले व प्रचाराची खालची पातळी गाठली. पण त्यांना गुजरात व हिमाचलच्या जनतेने जागा दाखवून दिली. भाजपाने विकासाचा मुद्दा मांडला तर काँग्रेसने जातीवादाचा आसरा घेतला. जनतेने विकासाला आणि भाजपाच्या नेतृत्वाला मत दिले, असे शेलार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले.