होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य शासनाचे कृषी पुरस्कार 3 वर्षे रखडले!

राज्य शासनाचे कृषी पुरस्कार 3 वर्षे रखडले!

Published On: Aug 15 2018 1:44AM | Last Updated: Aug 15 2018 1:44AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्‍यात काळ्या मातीचे सेवा करून कृषी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. मात्र गेल्या तीन वर्षापासून बळीराजाचा राज्य सरकारला विसर पडला असून, पुरस्काराचे वितरण रखडल्याची बाब पुढे आली आहे. 

शेतकर्‍यांच्या आत्महत्याच्या घटनांमुळे राज्य सरकारची प्रतिमेवर डाग पडला होता. शेतकर्‍यांना मदत म्हणून राज्य सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी, जे शेतकरी शेतात कष्ट करून उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांचा ही गौरव झाला असता तर खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली असती. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या कारकीर्दीमध्ये सन 2015 पर्यंत प्रलंबित मागील वर्षांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याचे समजते.

कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासाठी सध्यातरी पूर्ण वेळ मंत्री नाही. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्‍त कार्यभाग सोपविण्यात आला आहे. त्यामुळे, यावर्षी कृषी पुरस्काराचे वितरण होईल का, याकडे आता सजग शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. 

कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनिय  काम करणार्‍या शेतकरी संस्था यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण , महिलांसाठी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आदी पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पीक उत्पादन स्पर्धेतून ठराविक शेतकर्‍यांची  निवड केली जाते .  पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष राज्याचे कृषीमंत्री असतात. पशुसंवर्धनमंत्री, राज्यमंत्री, सचिव आणि कृषी आयुक्‍त हे या समितीमध्ये असतात. कृषी पुरस्कारासाठी जिल्हा व विभाग पातळीवर समिती असतात त्यातून शेतकर्‍यांची निवड केली जाते.