Sat, Nov 17, 2018 18:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदलणार बदलीचे धोरण

बदलणार बदलीचे धोरण

Published On: Feb 04 2018 2:28AM | Last Updated: Feb 04 2018 2:24AMमुंबई : दिलीप सपाटे 

राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदली धोरणातच आता बदल केला जाणार आहे. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी राबविलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदलीसाठी येत्या एप्रिल, मेमध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. बदलीसाठी 10 जागांचा पसंतीक्रम द्यावा लागणार असून त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी बदली झाल्यास तेथे रुजू व्हावे लागणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी व परिसरात वर्षानुवर्षे रहाणार्‍यांना तसेच राजकीय हस्तक्षेपाने मोक्याच्या ठिकाणी बसणार्‍या अधिकार्‍यांना आता चाप बसणार आहे. 

ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीचे नवे धोरण राबविले. शिक्षकांनी आपल्या पसंतीच्या 10 जागा दिल्यानंतर त्यांच्या समुपदेशनाने या जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीच्या या धोरणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून याच धर्तीवर राज्य सरकारच्या विविध विभागांनाही हे धोरण लागू करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्यानुसार येत्या एप्रिल, मे महिन्यात नव्या धोरणानुसार बदली प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी दिली. त्यादृष्टीने तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या बदली प्रक्रियेत बदलीस पात्र असलेले अधिकारी व कर्मचारी यांची यादी तसेच रिक्त होणार्‍या जागांची यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार बदलीसाठी प्राधान्यक्रमानुसार अर्ज मागविण्यात येतील. संबंधितांनी आपल्याला हव्या असलेल्या बदलीच्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम द्यावा. त्यानंतर त्याने यापूर्वी कोठेकोठे काम केले, त्याची गुणवत्ता, आवड आणि उपयोगिता तपासून बदली करण्यात येईल. त्यामुळे बदलीच्या धोरणात सुसूत्रता येईल, असेही खुल्लर यांनी सांगितले.  

काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर किंवा एकाच विभागात ठाण मांडून बसतात. नव्या धोरणात अशा प्रकारांना आळा बसणार आहे. तसेच सर्व अधिकार्‍यांना समान संधी दिली जाणार आहे.