राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी पगार

Last Updated: Oct 09 2019 9:47PM
Responsive image


मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारने दिवाळीचा सण लक्षात घेऊन नोव्हेंबरला होणारा पगार आठ दिवस आधी म्हणजे २४ ऑक्टोबरलाच देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठामधील कर्मचार्यांना   दिवाळीपूर्वी वेतन मिळणार आहे.  पेन्शनधारकांनाही या आदेशाचा लाभ मिळणार आहे.

सरकारी कर्मचा-यांना दर महिन्याच्या १ तारखेला पगार दिला जातो. मात्र यंदा दिवाळीचा सण महिनाअखेरीस आल्याने कर्मचा-यांची गैरसोय होऊ नये यासाठी आठ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वीही अनेकदा सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला होता. 

केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी आता राज्य सरकारलाही करावी लागणार आहे. यासाठी सरकारी कर्मचारी संघटना आग्रही असून नोव्हेंबरच्या पगारात ही वाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.