Mon, Sep 24, 2018 22:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबरपूर्वी सुरू करा

आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबरपूर्वी सुरू करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरपूर्वी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाच्या कामाला प्रारंभ करण्यात यावा, स्मारकासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी व ज्यांनी या स्मारकासाठी लढा उभारला त्यांच्याशी चर्चा करावी, अशा मागण्या मंगळवारी चैत्यभूमी ते इंदू मिलवर धडकलेल्या ‘आठवण मोर्चा’ने केल्या.

सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी केले, मात्र स्मारकाचे पुढील काम खोळंबले आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी सामाजिक समता मंचतर्फे मंगळवारी चैत्यभूमी ते इंदू मिलदरम्यान आठवण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेप्रसंगी विजय कांबळे म्हणाले, या स्मारकासाठी जानेवारीत राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येईल.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्मारकाच्या संदर्भात बैठका घेताना ज्यांनी स्मारकासाठी लढा दिला आहे त्यांच्याशी चर्चा करावी व स्मारकासाठी सुरुवातीपासून लढा देणार्‍या नेत्यांना डावलून निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली.

विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आठवण मोर्चात रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक चंद्रकांत कसबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव उत्तम गायकवाड, जितेंद्र कांबळे, प्रफुल्ल सरवदे, इंटकचे अनिल गणाचार्य, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सो. ना. कांबळे, तानाजी कांबळे, अभिजीत राणे, मनाली गवळी सहभागी  होते.