Tue, May 21, 2019 23:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्टॅम्प ड्युटी एक टक्का वाढणार!

स्टॅम्प ड्युटी एक टक्का वाढणार!

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:33AMमुंबई : विशेष  प्रतिनिधी                   

मुंबई शहरातील वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेऊन परिवहन सेवेत सुधारणा आणण्यासाठी  राज्य सरकारने मुद्रांक शुल्क  (स्टॅम्प ड्युटी)मध्ये एक टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या राजपत्रात न्याय व विधी विभागाच्या वतीने  याबाबत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सध्या मुंबईत सर्वसाधारणपणे 6 टक्के स्टॅम्प ड्युटीचा दर आहे. इमारतीतील खरेदी-विक्री, भाडेतत्त्वावरील करार, बक्षीस पात्र करारनामा, गहाण ठेवलेली कागदपत्रे याकरिता स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळे एक टक्का वाढ झाल्यास ही स्टॅम्प ड्युटी सात टक्के होणार आहे.  नोटबंदीनंतर मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण असताना मुंबईत स्टॅम्प ड्युटीत होणार्‍या वाढीमुळे या धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका कायदा 2018 मध्ये  स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरविण्यासाठी दुसर्‍यांदा बदल करण्यात येत आहेत. मुंबई शहरात झपाट्याने वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहतुकीच्या समस्येचा प्रश्न जटिल बनला आहे त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतीने  मोनो, मेट्रो रेल, फ्री वे, सीलिंक रोड यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत.   

स्टॅम्प ड्युटीचा वाढीव भार हा या विकास प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे. देशात अन्य राज्यांचा स्टॅम्प ड्युटीचा दर हा तीन टक्के ते 10 टक्के असा नियम असला तरी, प्रत्येक राज्य हे किती स्टॅम्प ड्युटी असावी याबाबत निर्णय घेत असते. सध्या मुंबईत स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री पुरुष यांचा एकच करारनामा असेल या ठिकाणी सर्वाना  6 टक्के स्टॅम्प ड्युटीचा दर आहे.

स्टॅम्प ड्युटी किती असावी यासाठी राज्य सरकारने निकष ठरविले आहेत. ज्या जागेचा व्यवहार होणार असेल तेथील रेडिरेकनरचा दर किंवा, करारनाम्यानुसार  खरेदी-विक्रीचा दर अधिक असेल तर तो ग्राह्य धरला जातो.