Thu, Jun 27, 2019 11:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटीचा चक्‍काजाम! वेतनवाढ रद्दची शक्यता, भाडेवाढीचाही फेरविचार

एसटीचा चक्‍काजाम! वेतनवाढ रद्दची शक्यता, भाडेवाढीचाही फेरविचार

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:57AMमुंबई ः विशेष प्रतिनिधी

अघोषित एसटी संपाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून राज्य परिवहन कर्मचार्‍यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य नसल्यास ती रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच 15 तारखेपासून होणार्‍या प्रस्तावित तिकीट दरातील 18 टक्के वाढीचाही फेरविचार होण्याची शक्यता आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपल्याशी चर्चा न करता कर्मचार्‍यांची पगारवाढ केली, असा आरोप करत संतप्त झालेल्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटीची सेवा कोलमडून टाकली. मोबाईल मेसेज आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे कर्मचार्‍यांना सामूहिक गैरहजर राहण्याचा संदेश पाठवून अनेक स्थानकांमधील बसेस उभ्या ठेवल्याने एसटीचा 15 कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कामगारांना गैरहजर राहण्याचे संदेश पाठविण्यास सुरुवात केली. या संदेशाची चाहुल लागल्यानंतर एसटी प्रशासनाने जोरदार हालचाली केल्या. मान्यताप्राप्त संघटनेच्या विरोधातील कामगार संघटनांची मदत घेण्याचाही प्रशासनाने प्रयत्न केला, पण यश आले नाही. परिणामी, निलंबन आणि बडतर्फीचे हत्यार उपसतानाच घोषित वेतनवाढ रद्द करण्याच्या विचारापर्यंत एसटी महामंडळ पोहोचले आहे. याशिवाय 18% भाडेवाढीचा फेरविचार सुरू असल्याचे संकेतही परिवहन मंत्रालयातून देण्यात आले. 

एस.टी. कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी तसेच वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्याच्या मागण्यांसाठी हा अघोषित संप पुकारण्यात आला. या संपामुळे राज्यभरातील 85 टक्के सेवा कोलमडुन पडल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कामगार संघटेनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.

कुर्ला, परेल आगारांमधुन शुक्रवारी सकाळपासुन एकही बस सुटली नाही. तर नाशिक, शिरपुर, भिवंडी. चोपडा, उदगीर, वसई, पंढरपुर, पनवेल,चाळीसगाव, खेड , दापोली, गुहागर तसेच पुणे विभागातील इंदापुर, दौंड,शिरुर,तळेगाव,बारामती,भोर,नारायणगाव, स्वारगेट,शिवाजीनगर आगार बंद होते. ठाणे जिल्ह्यातील वाडा, शहापुर,मुरबाड आगारातून सकाळच्या बस सुटल्या. मात्र ठाणे येथून सुटणार्‍या पनवेल, बोरिवली, भाईंदर  या जिल्ह्यातंर्गत सेवा बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस या संघटनेचे नेते श्रीरंग बरगे यांनी राज्यातील 250 डेपोंपैकी 49 डेपो पुर्ण चालु होते, 58 डेपो पुर्ण बंद तर उर्वरीत डेपोंमधुन संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, असा दावा केला. संपामुळे एसटीचे सुमारे 15 कोटी रुपयाचा महसूल बुडाला असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 30 टक्के बसच्या फेर्‍या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 145 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती. तसेच राज्यातील 80 आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात संपाचे परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवले.  तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 60 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार्‍या 35,249 बस फेर्‍यांपैकी 10,397 फेर्‍या सुरळीत सुरु होत्या, असा दावाही परिवहन महामंडळाने केला.

 एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपाची प्रवाशांना झळ लागू नये यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभागाने शाळा व कंपन्यांच्या बसेस तसेच इतर खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. परिवहन विभागाने पोलीस, होमगार्ड तसेच पालिकांच्या परिवहन सेवांची मदत घ्यावी,  असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले होते.