Tue, Jul 23, 2019 02:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वनगा सांगा कुणाचे?

वनगा सांगा कुणाचे?

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:49AMमनोर : वार्ताहर 

खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघरमध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेले दोन महिने दुर्लक्षित असलेले वनगा कुटुंब अचानक प्रकाशझोतात आले आहे. वनगा पुत्र श्रीनिवास यांनी चार दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आणि आता भारतीय जनता पक्षानेही त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्याने एकच राजकीय गोंधळ उडाला आहे.

श्रीनिवास वनगा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपच्या तंबूत मोठाच गोंधळ सुरू झाला असून वनगा कुटुंबाने पक्ष सोडू नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी प्रयत्न चालवले आहेत. गंमत म्हणजे वनगा पुत्राचा शिवसेना प्रवेश होईपर्यंत भाजपकडून पालघरच्या उमेदवारीबद्दल कोणतेही भाष्य केले गेलेले नव्हते. श्रीनिवास मातोश्रीवर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा विचार जाहीर केला. फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, श्रीनिवास यांना भाजपने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपण स्वतः शिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. पालघरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने मदत करावी अशी विनंतीही केली. त्यावर सुभाष देसाई व अन्य मंत्री आपल्याशी चर्चा करतील, असे उद्धव म्हणाले होते. त्यानुसार महाराष्ट्र दिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्याशी चर्चाही केली आणि 3 मे रोजी मी श्रीनिवास वनगा यांच्या सेनाप्रवेशाची बातमी ऐकतो...

श्रीनिवास वनगा यांनी 15 दिवस प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे सांगितले.या पार्श्‍वभूमीवर वनगा कुटुंबाचा ठावठिकाणा मात्र बदललेला नाही. त्यांनी अधिकृतपणे सेनेत प्रवेश केला असून श्रीनिवास हेच सेनेचे उमेदवार असतील, असे संकेत आता शिवसेनेकडून दिले जात आहेत.  शनिवारी मनोरच्या सायलेन्ट रिसॉर्ट येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ नेते उदय पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, उपसभापती नीलेश गंधे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. एरव्ही शिवसेना अशा पोटनिवडणुका लढवत नसली तरी  पालघर लोकसभेची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.  पालघर लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख यावेळी उपस्थित होते. श्रीनिवास वनगा यांच्या रूपाने सेनेला चांगली संधी मिळाली असून त्या संधीचे सोने करावे.

ज्या भाजपसाठी दिवंगत खासदार वनगा यांनी आपले पुरते आयुष्य वेचले, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करणार्‍या भाजपला धडा शिकवण्याची संधी सेना पक्षप्रमुखांनी हिरावून घेऊ नये, असा आमचा संदेश उद्धव ठाकरेंना कळवा, अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. वसई तालुका आमदार हितेंद्र ठाकूर यांची  मक्तेदारी मोडून काढण्याची संधी आम्हाला द्यावी, अशी मागणी वसई, नालासोपारा, विरारमधील उपस्थित शिवसैनिक, पदाधिकार्‍यांनी केली. तुमच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्‍वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले.

निवडणूक होईपर्यंत मतदारसंघ सोडू नका

पालघर लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकाही पदाधिकार्‍याने आपला मतदारसंघ सोडून बाहेर जाऊ नये, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना पालघरचे पोटनिवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे संकेतच े शिंदे यांनी दिले. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार अमित घोडा यांना निवडून आणण्यासाठी वनगा आमच्यापेक्षा दोन पावले पुढे होते, याची जाणीव सेनेला आहे, असे शिंदे म्हणाले.

बुलेट ट्रेनला विरोध

भाजपचे स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करणार्‍या या प्रकल्पाला सेनेचा पूर्ण विरोध राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण ह्यांनी जाहीर केले. पोट निवडणुकीत वनगा यांचे अनेक समर्थक श्रीनिवासला मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.