Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वनगाच शिवसेनेेचे उमेदवार

वनगाच शिवसेनेेचे उमेदवार

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:40AMबोईसर : वार्ताहर 

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनाच शिवसेनेने मैदानात उतरवून भाजपला मोठा झटका दिला आहे. ते मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेश पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. या निवडणुकीत राज्याच्या सत्तेतील दोन पक्षांमध्येच लढाई होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असला तरी भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहेत.

खा. वनगा यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून वनगापुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा वनगा कुटुंबाची होती. मात्र, भाजपने वनगा कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, गेल्या आठवड्यात वनगा कुटुंबाने मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पालघरची निवडणूक लढवून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी द्यावी, अशी भावना सभा घेऊन व्यक्त केली. या भावनेची पक्षनेतृत्वाने दखल घेतली असून श्रीनिवास वनगा यांचा उमेदवार अर्ज मंगळवारी भरण्याचे आदेश दिले. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी बोईसरमध्ये शिवसैनिकांची सभा बोलावण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेश बोईसर विधानसभा क्षेत्राचे तालुका प्रमुख नीलम संख्ये आणि शहर प्रमुख मुकेश पाटील यांनी दिले.

पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर तालुका  महिला संघटक नीलम म्हात्रे, उपसभापती मेघन पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमलाकर दळवी, पंचयत समिती गटनेता सुभाष म्हात्रे, पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी, ज्योती पाटील, संध्या खुंटे,  माजी जिल्हा परिषद सदस्य दुमडा, गोपीनाथ घरत, राहुल पाटील उपस्थित होते.

Tags : Mumbai, mumbai news, Srinivas Vanaga, Shivsena, Candidate,