Tue, Apr 23, 2019 00:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन

बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन

Published On: Mar 01 2018 2:16AM | Last Updated: Mar 01 2018 2:12AMमुंबई : प्रतिनिधी

दर्जेदार अभिनयाद्वारे केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारी बॉलिवूडची चांदनी, श्रीदेवीला तिच्या चाहत्यांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. विलेपार्ले पश्चिम येथील पवनहंसजवळील हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे पती बोनी कपूर यांनी तिला मुखाग्नी दिला. 

अंधेरी लोखंडवाला येथील सेलिब्रेशन क्लब ते विले-पार्लेतील स्मशानभूमी दरम्यान श्रीदेवीची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांसोबतच हजारो चाहत्यांनी सकाळपासूनच उपस्थिती लावली होती. या चाहत्यांची गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

श्रीदेवीने आपल्या घरच्यांना सांगून ठेवल्याप्रमाणे तिच्या अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली होती. पांढरा हा श्रीदेवीचा आवडता रंग. त्यामुळे अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन क्‍लबचा हॉल देखील मोगर्‍याच्या फुलांनी संपूर्ण सजवला होता. अंत्ययात्रेतील ट्रकला पांढर्‍या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. सोनेरी आणि लाल रंगाच्या साडीमधील श्रीदेवीला एका सुवासिनीप्रमाणे निरोप देण्यात आला. मात्र ट्रकला फुलांच्या माळांचे आच्छादन असल्याने चाहत्याना तिचे अखेरचे मुखदर्शन घेता आले नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. 

अंत्ययात्रेसाठी सजवलेल्या ट्रकमध्ये बोनी कपूर, अर्जून कपूर आणि मोहीत मारवाह उपस्थित होते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्रीदेवीला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुंबईत पोलिसांकडून रायफलीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. 

श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या कलाकारांनी मोठी गर्दी केली होती. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते. रजनीकांत आणि कमल हसन हे तामिळ सुपरस्टारही आपल्या या सहकार्‍याला निरोप देण्यासाठी चेन्नईहून मुंबईला आले होते.

बॉलीवूड मधिल पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांच्या पार्थिवावर बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलीवूडने आणि मुंबईसह देशभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांनी साश्रूनयनांनी आपल्या आवडत्या नायिकेला अखेरचा निरोप दिला. 

मिस हवाहवाई, बॉलीवूडची चांदनी, म्हणजेच श्रीदेवी. एकेकाळी बॉलीवूडवर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री अचानक जग सोडून गेली आणि प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. त्यामुळे श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनाला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता.

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले पश्‍चिमेकडील पवनहंस जवळील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यंसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी बॉलीवूड इंडस्ट्री आणि हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते. पाणावलेल्या डोळ्यांनी बॉलीवूडने श्रीदेवी यांना अखेरचा निरोप दिला.

मंगळवारी संध्याकाळी श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईला आणण्यात आले. बुधवारी सकाळी 9.30 ते 2.20 या वेळात पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोखंडवाला परिसरातील सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. हिंदी सिनेमाच्या पहिल्या महिला सुपरस्टारला अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रेशन क्लबमध्ये अख्ख बॉलीवूड लोटले होते. ऐश्वर्या बच्चन, विद्या बालन यांसाख्या अभिनेत्रींना श्रीदेवी यांचे पार्थिव पाहून अश्रू रोखता आले नाहीत.

भारतीय तिरंगा झेंड्यात लपेटून त्यांचे पार्थिव दुपारी 2.20 वाजल्याच्या सुमारास स्मशानभूमीकडे रवाना झाले. मोठ्या सजवलेल्या रथातून श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. बोनी कपूर, अर्जुन कपूर, अनिल कपूर यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती ट्रकवर उपस्थित होते. तर ट्रकच्या सोबत हजारोंचा जनसमुदाय चालत होता. त्यामुळे जुहू आणि एस.व्ही. रोड परिसरातील वाहतुककोंडी होऊन प्रवाशांचे मोठे हाल झाले.

24 फेब्रुवारीला दुबईतल्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच बॉलीवूडवर शोककळा पसरल्याने त्यांच्या चाहत्यांनाही मोठा सदमा बसला. 1980 ते 1990 च्या दशकात श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाची भुरळ संपूर्ण देशावर पाडली होती. बॉलीवूडची ही चांदनी अनंतात विलीन झाली.