Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अफवा पसरविणे नेटकऱ्यांना पडणार महागात

अफवा पसरविणे नेटकऱ्यांना पडणार महागात

Published On: Jan 09 2018 3:44PM | Last Updated: Jan 09 2018 3:44PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

काही दिवसांपूर्वी कल्याणात झालेल्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर अफवांचे उधाण आले असून, शहरात शांतता असतानाही अफवांचे मेसेज झपाट्याने व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या अफवांमुळे पोलिसांची दमछाक झाली असतानाच कोळशेवाडी पोलिसांनी अफवा पसरविणार्‍या नेटकऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील भीम सैनिकानीही निषेध मोर्चा, रस्ता रोको, रेल रोको करून उत्फूर्तपणे महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. हिंसाचारादरम्यान अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. याच दरम्यान कल्याण पूर्वेत दोन गटात झालेल्या वादातून जोरदार राडा झाला. या राड्याप्रकरणी पोलिसांनी 22 शिवसैनिक व 10 भीमसैनिकांना अटक केली. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत दुसऱ्या दिवशी कल्याण पूर्व बंद पुकारला. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर अफवांचे उधाण आले. कधी कुणाची हत्या, तर कधी तोडफोड, कधी कल्याण बंद, असे खोटे मेसेज काही नेटकरी पसरवू लागले. आंदोलनानंतर पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात करत शहरात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न केला. असे असतानाही काही अतिउत्साही मंडळींनी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर चुकीचे व दिशाहीन मेसेज फॉरवर्ड करण्याचा सपाटा लावला. एकीकडे क्षणार्धात व्हायरल झालेल्या अशा मेसेजेसमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी शहरात शांतता प्रस्थापित केली असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. मात्र तरीही अफवांचे पीक वाढत चालल्याने कोळशेवाडी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. अफवा पसरवणाऱ्या अज्ञात नेटकऱ्यांच्या विरोधात अखेर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आता या मंडळींना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईम सेलचा आधार घेतला आहे.