Tue, Apr 23, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलप्रलयात बुडाला हिरव्या वेलचीचा गाव

जलप्रलयात बुडाला हिरव्या वेलचीचा गाव

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:29AMनवी मुंबई : प्रतिनिधी

महापुरामुळे केरळ अक्षरश: उद्ध्वस्त झाले असून, तेथील हिरव्या वेलचीचे एक गाव पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. याच गावचा घाऊक मसाला व्यापार करणार्‍या शंभर व्यापार्‍यांचा व्यापार ठप्प झाला असून परिणामी, केरळ मसाल्याची देशभरातील आवक गेल्या 15 दिवसांपासून बंद पडली. परिणामी, हिरवी वेलची, जायफळ आणि काळी मिरी या पदार्थांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे घाऊक व्यापारी श्याम मेहता यांनी पुढारीला सांगितले.

केरळमधून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तरांचल, बिहार, उत्तरप्रदेशसह इतर राज्यांना मसाला पुरवला जातो. हा संपूर्ण व्यवसाय जलप्रलयात सापडला. इदुक्‍की आणि वायनाड जिल्ह्यांत 40 टक्के वेलची पीक उद्ध्वस्त झाले आहे. एकट्या मुंबई एपीएमसीतील 50 घाऊक मसाला व्यापार्‍यांना रोज 500 किलो मसाले पदार्थ केरळातून येतात. गेल्या 15 दिवसांपासून ही आवक ठप्प आहे. एपीएमसीतील घाऊक मसाला व्यापारी श्याम मेहता म्हणाले, आमच्या 80 टक्के व्यापार्‍यांचा माल या जलप्रलयात वाहून गेला. जो शिल्लक आहे तो कुठे आहे हेदेखील त्यांना माहिती नाही अशी भयानक स्थिती केरळमध्ये आहे. केरळात हिरव्या वेलचीचे पीक घेणारे एक गाव पूर्ण पाण्याखाली आहे.

मसाल्यातील खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंसाठी केरळ हीच एकमेव बाजारपेठ आहे, तर अन्य वस्तूंना आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यांचा पर्याय आहे. त्यामुळे याआधी 200 रुपये किलो असलेले खोबरे आता 230 ते 240 रुपये, 1200 रुपये किलो असलेले वेलदोडे आता 1500 ते 1600 रुपये किलो, 550 रुपये किलो असलेली लवंग आता 600 ते 700 रुपये किलो, 1500 रुपये किलो असलेली कपूरचिनी आता 2000 ते 2200 रुपये किलो झाली आहे. अचानक झालेल्या या भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. बाजारपेठेतील ही परिस्थिती अजून सहा महिने तरी अशीच कायम राहणार आहे.