Sun, May 26, 2019 01:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंंबईत दुचाकीवाढीचा ‘स्पीड’ सुसाट

मुंंबईत दुचाकीवाढीचा ‘स्पीड’ सुसाट

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:29AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या लोकसंख्येबरोबरच मुंबईवर वाहनांचा बोजाही वाढत चालला आहे. विशेषतः दुचाकी वाहनांचे प्रमाण प्रचंड गतीने वाढले आहे. सध्या शहरात 20 लाखांहून अधिक दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. तर सर्व प्रकारच्या वाहन नोंदणीचा दररोजचा आकडा 800 हून अधिक झाला आहे. दररोज सुमारे 821 वाहनांची नोंदणी होत आहे. 

सध्या मुंबई शहरातील एकूण वाहनांची संख्या 35 लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये 10 लाख खासगी कारचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये दुचाकींच्या संख्येत तब्बल 77 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. तर दुचाकी आणि कार यांची एकत्रित संख्या एकूण वाहनांच्या तुलनेत 87 टक्क्यांवर पोहोचली आहे. 

मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात दुचाकीवरून प्रवास करणे तसे सोयीचे आहे. कोणत्याही ठिकाणी सहजगत्या आणि जलदरीतीने पोहोचण्यासाठी दुचाकी सर्वात उपयुक्‍त असल्याने ती खरेदी करणार्‍यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. पुढील काळात  ई-स्कूटरचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता एका वाहतूक तज्ज्ञाने व्यक्‍त केली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी, शिकवण्यांसाठी त्याचबरोबर घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर केला जातो. उपनगरांतील अनेक रेल्वे स्थानकांनजीक परवडणार्‍या दरात पार्किंगची सोय झाल्याने दुचाकीला प्राधान्य मिळत आहे. तसेच महिला आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून दुचाकी वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुचाकीचे प्रमाण वाढण्याबरोबर त्या अनुषंगाने काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. ध्वनिप्रदूषणामध्ये दुचाकीच्या आवाजाची मोठी भर पडली आहे. तसेच दुचाकीच्या अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही अपवाद वगळता दुचाकीस्वार वाहतुकीचे नियम पाळताना दिसून येत नाहीत. सिग्‍नल तोडणे, चुकीच्या दिशेने चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी उभी करणे, कशाही पद्धतीने पार्किंग करणे असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे पादचार्‍यांच्या समस्यांमध्ये भर पडत चालली आहे.