मुंबई : चंद्रशेखर माताडे
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे काम जमीनीच्या मोजणीअभावी रखडल्यामुळे खासगी सल्लागारामार्फत हे काम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्यामुळे कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, रायगड व औरंगाबादसह अन्य जिल्ह्यतील या कामांना गती येणार आहे.
राज्यात भुपृष्ठ परिवहन मंत्रालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे 22 हजार किलोमीटरच्या रस्त्याचे जाळे विणण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील बरेच रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात वरील जिल्ह्यांबरोबरच नांदेड, धुळे, नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांचाही समावेश आहे. या सर्व जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे हे काम पुर्ण करण्याचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये भू संपादन ही मोठी अडचण ठरली आहे. भू संपादनाची कामे वेगाने होण्यासाठी राज्य सरकारने उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उपलब्ध करून दिले आहेत. मात्र तरीही या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अलिकडेच चर्चा केली होती. या चर्चेत प्रामुख्याने राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी भू- संपादन व यूटिलीटी शिफ्टींग या विषयावर चर्चा झाली.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी लागणार्या जमिनीच्या मोजणीचे काम हे भूमी अभिलेख विभागामार्फत केले जात आहे. मात्र या विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याचे व त्याचबरोबर साधनसामुग्रीचाही अभाव असल्याचे लक्षात आले. या एकाच कारणासाठी भू संपादनाचे काम रखडले असुन राष्ट्रीय महामार्गाचे काम नियोजित वेळेत करणे शक्य नसल्याने यावर पर्याय शोधण्यात आला आहे.
त्यानुसार भू संपादन वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन जे मोजणीचे काम करावे लागते ते काम भू संपादन संस्थेने नियुक्त केलेल्या खासगी सल्लागारामार्फत करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे काम करणार्यांना भुमी अभिलेख विभागाने प्रमाणित करण्याची गरज आहे. याबाबतचे अधिकार हे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. भुमी अभिलेख कार्यालयातील अनुभवी , सक्षम उपअधिक्षक भुमी अभिलेख यांच्यावर यासाठीची समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
Tags : mumbai, mumbai news, national high Highway, development, Speed,