होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाचे विशेष पथक

घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाचे विशेष पथक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाच्या संक्रमण शिबिरामधील घुसखोरीला आळा घालण्यासाठी म्हाडाच्या आर.आर.विभागाच्या वतीने विशेष पथक तयार केले आहे. तसेच घुसखोरी करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ संक्रमण शिबिरातून बाहेर काढण्यात येणार आहे. यासोबतच घुसखोरीला जो अधिकारी जबाबदार असेल किंवा चौकशीमध्ये जो अधिकारी दोषी ठरेल त्याला तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे. 

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमधील रिकाम्या गाळ्यांमध्ये घुसखोरांकडून घुसखोरी होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडून करण्यात येत होता, मात्र आता अशा घुसखोरांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी मंडळाकडून आता ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे म्हाडने स्पष्ट केले आहे.     

म्हाडाने 2009-10 साली संक्रमण शिबिरांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये  सुमारे साडेआठ हजार घुसखोर संक्रमण शिबिरामध्ये राहत असल्याचे समोर आले होते. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही म्हाडाला घुसखोरांना बाहेर काढता आलेले नाही.

यामुळे या घुसखोरांविरोधात दंडात्मक कारवाई करत त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव म्हाडाने सरकारकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे, मात्र म्हाडाच्या नव्या उपाययोजनांनुसार म्हाडाच्या सर्व्हेच्या आठ हजार घुसखोरांना वगळून नव्याने घुसखोरी केलेल्यांना किंवा घुसखोरी करणार्‍यांना रोखण्यासाठी मंडळाच्या वतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.