Mon, Jun 17, 2019 14:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलांच्या संगोपनासाठी विशेष रजेला सरकारचा हिरवा कंदील

मुलांच्या संगोपनासाठी विशेष रजेला सरकारचा हिरवा कंदील

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:24AMठाणे : प्रतिनिधी 

प्रसूती रजा, नियमित रजा वगळून राज्यातील शासकीय महिला कर्मचार्‍यांना अपत्य 18 वर्षांचे होईपर्यंत  2 वर्षे टप्प्याटप्प्यात बालसंगोपनासाठी विशेष रजा द्यावी, या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागणीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना विशेष बालसंगोपन रजा 2 वर्षांच्या कालावधीची नाही तर कमी - अधिक फरकाने मिळण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने 2016 पासून महिला आधिकारी आणि कर्मचार्‍यांना 2 मुले 18 वर्षांपर्यंतची होईपर्यंत टप्याटप्यात 2 वर्षांची  पूर्ण पगारी विशेष बालसंगोपन रजा मंजूर केली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महिला कर्मचार्‍यांना अशी 2 वर्षांची विशेष रजा मंजूर होण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित आधिकारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

अलीकडेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत महासंघाच्या या मागणीबाबत सकारात्मक निर्णय झाला असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक व  मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली. मुलांचे पालन पोषण चांगल्या पध्दतीने करता यावे, मुलांच्या आयुष्यातील 10 वी सारख्या महत्वाच्या शैक्षणिक वर्षाच्या काळात, किंवा मुलांच्या काही समस्या असतील, मुलांच्या संदर्भात काही अडचण असेल, आजारपणाच्या काळात महिला कर्मचार्‍यांनी ही रजा मिळावी, यासाठी महासंघाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. केंद्र सरकारच्या धर्तीवर ही 2 वर्षांची विशेष रजा महाराष्ट्रातील महिला आधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही मंजूर व्हावी, अशी आमची मागणी आहे, परंतु आतापर्यंत झालेल्या बैठकांनुसार राज्य सरकार अगदी 2 वर्षांची नाहीतर त्यापेक्षा कमी - आधिक फरकाने मंजूर करण्याच्या विचारात होईल, अशी सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे याबाबत निर्णय होण्याचा बेतात आहे, असा विश्‍वास कुलथे यांनी व्यक्त केला.