Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण

महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:40AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महिला उद्योजकता ही आर्थिक वाढीचा एक महत्त्वाचे स्रोत आहे. राज्याच्या औद्योगिक वाढीच्या मुख्य प्रवाहात महिलांनी पुढे यावे, जास्तीत जास्त महिला उद्योजक तयार व्हावेत यासाठी विशेष धोरण राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या धोरणानुसार एमआयडीसी, व्यावसायिक केंद्रे, रेल्वे व बस स्थानके तसेच मॉल्स व बाजारपेठांत महिला उद्योजकांसाठी जागा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. या धोरणांतर्गत पाच वर्षांत जवळपास दोन हजार कोटींची गुंतवणूक होऊन प्रत्यक्ष एक लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना उद्योग-व्यवसाय उभारणी करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये तांत्रिक व व्यवस्थापकीय ज्ञानाचा अभाव, मर्यादित आर्थिक स्रोत व गुंतवणूक सहाय्य, परवडण्यायोग्य व सुरक्षित जागांचा अभाव इत्यादींचा समावेश आहे. महिला उद्योजकांच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण व पूरक-पोषक वातावरण तयार करण्यासाठी विविध विशेष प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे दरवर्षी अंदाजे 648 कोटी 11 लाख रुपयांचा भार शासकीय तिजोरीवर पडणार असल्याचे उद्योग मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.