Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर बोलणे एसटी चालकांना पडतेय महाग

मोबाईलवर बोलणे एसटी चालकांना पडतेय महाग

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:02AMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

राज्यातील एसटीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी मोबाईलवर बोलणार्‍या चालकांना चाप लावण्यासाठी निलंबन, वेतनवाढ रोखणे, दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर गेल्या चार महिन्यांत दहा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

विशेष करुन मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरुन जाणार्‍या शिवनेरी, लालडबा आणि आता शिवशाही बसचे चालक महामार्गावर मोबाईलवर बोलताना आढळून येतात. तर ग्रामीण भागात आगारातुन गाडी बाहेर काढतानाचा चालक कानाला मोबाईल लावत गाडी मार्गस्थ करताना अनेकदा दिसून येतात. पुणे- मुंबई विना वाहक, नाशिक -मुंबई विना वाहक, नाशिक -ठाणे विनावाहक, नाशिक -धुळे विनावाहक, मुंबई सोलापूर, मुंबई अलिबाग, मुंबई-सातारा यामार्गावर मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालकांकडून होताना दिसून येतो. याबाबत वाढत्या तक्रारी आल्यानंतर एसटी महांडळाने कडक पाऊल उचलत कारवाईला सुरुवात केली आहे. 

एसटीचे अपघात रोखता यावेत यासाठी वाहतूक विभागाने ही कंबर कसली आहे. राज्यातील 34 विभागीय अधिकार्‍यांना कर्तव्यावर असताना म्हणजेच एसटी चालवत असताना चालक मोबाईलवर बोलताना आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत 2009 पासून ही कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र अनेक आगारप्रमुखांनी या आदेशाचे पालन केले नव्हते. मात्र प्रवाशांनी व्हिडीओ शुटिंग करुन ती क्‍लिप व्हायरल करण्यास सुरुवात केल्यापासून पुन्हा एकदा ही कारवाई प्रभावीपणे सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग विभागातील तीन तर औरंगाबाद (पैठण) एक, सोलापूर ( अक्कलकोट) तीन आणि सातारा वडूज येथील एक अशा नऊ एसटी चालकांवर निलंबनाची करावाई करण्यात आली आहे. तर काही चालकांवर शभंर रुपये दंड, तीन महिने अल्प वेतनवाढ स्थगित, मुळवेतनाच्या दहापट वसूली, मुळवेतनाच्या तीनटक्के दंड, एक वर्ष वेतनवाढ कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहे.