Mon, Jun 17, 2019 18:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › vगोव्यातील ‘केटामाईन’चे द.आफ्रिका, कॅनडा कनेक्शन

गोव्यातील ‘केटामाईन’चे द.आफ्रिका, कॅनडा कनेक्शन

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:45AMपणजी/मुंबई : प्रतिनिधी

गोव्यामधील सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत एका बंद असलेल्या फॅक्टरीत दिल्लीतील महसूल दक्षता खात्याच्या पथकाने धाड टाकून जप्त केलेल्या चार कोटी रुपयांच्या केटामाईन साठ्याप्रकरणी चौकशी गतिमान झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सदरचे रॅकेट आंतरराष्ट्रीय असून, हा व्यवहार दक्षिण आफ्रिका तसेच कॅनडातून हाताळला जात असल्याचे पुढे आले आहे. चौकशीदरम्यान अँथोनी पॉल या ब्रिटनच्या इसमासह मुंबईतील सचिन शेवडे या युवकाला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.याप्रकरणी आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिसुर्ले या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत व्यवसायात असलेला प्रमुख संशयित जिमी सिंग  सध्या  बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

सचिन शेवडे हा पनवेल-मुंबई या ठिकाणी रासायनिक कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत होता व   तेथे रसायने, औषधे बनवण्यासाठी केटामाईनचा वापर करण्यात येत होता. यामुळे याचा संबंध केटामाईन व्यवसायातील प्रमुख जिमी याच्याशी आल्यानंतर त्याने या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभाग दाखविल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील महसूल दक्षता पथकाने पिसुर्ले येथे धाड टाकण्यापूर्वी मुंबईतील जोगेश्‍वरी येथे केलेल्या कारवाईत सदर व्यवसायाची सूत्रे दक्षिण आफ्रिका व कॅनडातून हाताळली जात असल्याचे   चौकशीअंती उघडकीस आले आहे.काही महिन्यांपूर्वी पिसुर्लेपासून काही अंतरावर असलेल्या सोनशी  गावातील एका तरुणाचे ड्रग्ज सेवनाने निधन झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे अमली पदार्थांचा मोठा व्यवहार सत्तरी तालुक्यात चालतो व पोलिसांना याबाबत काही पत्ता लागत नाही, याबाबत नागरिकांनी  आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे.