Thu, Feb 21, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान मोदींना पर्याय महाराष्ट्र देऊ शकतो : शरद पवार

पंतप्रधान मोदींना पर्याय महाराष्ट्र देऊ शकतो : शरद पवार

Published On: Jul 21 2018 8:28PM | Last Updated: Jul 21 2018 8:28PMमुंबई : प्रतिनिधी 

देशातील मागील चार वर्षांतली परिस्थिती पाहिली तर एका वेगळ्याच स्थितीतून देश जातो आहे. समाजामधली, माणसांमधली तेढ वाढीला लागली आहे. ही बाब निश्‍चितच चिंतेची असून काही लोकांना राज्यघटना दुरुस्त करायची नसून घटना बदलायची आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चेंबूर येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शनिवारी केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी भाजपाकडे ज्या उद्देशाने देशाची सत्ता दिली, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचे सांगत भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील राज्या-राज्यांत, माणसा-माणसांत, समाजांत एकवाक्यता राहीली नाही. जातीय तेढ निर्माण झाली आहे. ही बाब चिंतेची असल्याचे ते म्हणाले. 

राज्या-राज्यांमध्ये, माणसांमध्ये, समाजांमध्ये एकवाक्यता कशी राहिल याची काळजी केंद्र सरकारने घेणे आवश्यक होते. मात्र त्या उलट परिस्थिती देशात दिसत आहे. देशात अनेक भागात मांसाहार केला जातो. तरीही गोमांसच्या संशयावरून मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडतात, हे अत्यंत निदंनिय आहे. दादरीमध्ये असाच प्रकार घडला होता. गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत त्याला जीव गमवावा लागला होता. मात्र, ते गोमांस नव्हतेच असा चौकशीचा अहवाल समोर आला होता. आता त्या व्यक्तीच्या कुटुंबांची जबाबदारी कोणाची? असा प्रश्‍न त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. ते देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी यशस्वी ठरले नाहीत. मोदींना पर्याय काय हा प्रश्‍न विचारला जातो. एका दिवसात कोणाही पर्याय उभा राहत नाही. मात्र भाजपा विरोधातील सर्वजन एकत्र येऊन महाराष्ट्र हा पर्याय देऊ शकतो, असे पवार म्हणाले.