Sat, Apr 20, 2019 08:29



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चांदोलीमध्ये आता घुमणार ताडोबातील वाघांची डरकाळी

चांदोलीत घुमणार ताडोबातील वाघांची डरकाळी

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AM



मुंबई : विशेष प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील चांदोली नॅशनल पार्कला आतंरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यामधील काही वाघ चांदोलीत नेण्याबाबत पर्यटन विभाग विचार करत आहे. वन विभागाने या सूचनेला हिरवा झेंडा दिला आहे. मात्र, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील वातावरण व भौगोलिक स्थिती वाघाला मानवेल का, याचा अभ्यास केल्यानंतर अंतिम परवानगी दिली जाणार आहे. 

चांदोली नॅशनल पार्कचे क्षेत्रफळ 122.65 वर्ग किलोमीटर असून सांगली, सातारा व कोल्हापूरच्या सीमा या पार्काशी जोडल्या आहेत. 1985 मध्ये हे पार्क वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित केले होते. त्यानंतर 2004 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. पुण्यापासुन 210 किलोमीटर तर मुंबईपासुन 380 किलोमीटरवर हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे चांदोलीचा विकास व्हावा, ही पर्यटन विभागाची इच्छा असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

ताडोबा अभयारण्यामधील वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तुलनेने चांदोलीतील संख्या कमी असल्यामुळे पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. पर्यटकांनी चांदोलीलाही पसंती द्यावी, अशी पर्यटन विभागाची इच्छा आहे. त्यासाठी ताडोबामधील काही वाघ चांदोलीत आणण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात वन आणि पर्यटन विभाग अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक झाली आहे.

चांदोलीमधील जलाशयाच्या किनारी पर्यटक निवासस्थाने उभी केली जातील. सोबत त्या ठिकाणी बोटिंग सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत जलसंधारण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. या विभागाच्या मंजुरीनंतर येथे काम सुरू केले जाईल, असेही रावल म्हणाले.