Tue, Mar 26, 2019 22:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक लाख विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे प्रशिक्षण

एक लाख विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे प्रशिक्षण

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

आयआयटी मुंबईकडून तब्बल एक लाख विद्यार्थ्यांना सौर दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्टुडंट सोलर अ‍ॅम्बेसिडर्स या उपक्रमाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

देशातील चार कोटी घरे विजेविना आहेत. तर अनेक घरात पुरेसा प्रकाश नाही. याचा परिणाम शिक्षणावर होत असून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईने सौर दिवे तयार करून ते सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला आहे. या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीनिमित्त एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज जगभरात कार्बन उत्सर्जनाचे समस्या भेडसावत आहे. ते कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. असे असताना भारतानेही यात पुढाकार घेतला असून सौर ऊर्जेचा अधिक वापर कसा करता येईल यावर भर दिला जाऊ लागला आहे. याचाच एक भाग म्हणून आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी सौर उर्जेचा वापर करून गावगावातील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला. पीएचडी करत असताना त्यांनी सौर उर्जा साठवून ठेवणार्‍या उपकरणावर ते संशोधन करत होते. याचा वापर करून त्यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौर दिवे वाटलेत. इतकेच नव्हे तर तीन हजार महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना सौर दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी तेच विकून पैसे कमाविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.