होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असताना आता या विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे, हे निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. सरकारच्या या भूमिकेवर धनगर बांधव नाराज झाले असून फेरविचार झाल्यास विद्यापीठाच्या नामांतरावरून वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सोलापूरला विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी राज्यातील विविध धनगर संघटनांची मागणी होती. तर या विद्यापीठाला संत महात्मा बसवेश्‍वर यांचे नाव देण्याची लिंगायत समाजाची मागणी आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची नुकतीच घोषणा केली होती. 

विद्यापीठ नामांतराच्या घोषणेमुळे लिंगायत समाज नाराज झाला आहे. सोलापूरला लागूनच कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे. सध्या या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोलापूर विद्यापीठाला संत महात्मा बसवेश्‍वर यांच्याऐवजी अहिल्याबाईचे नाव देण्याची घोषणा केल्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसू शकेल, अशी शक्यता वाटल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांच्याच घोषणेवर अभ्यास करण्यासाठी मंत्रिस्तरीय उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तावडे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा या समितीत समावेश आहे.