Thu, Jul 18, 2019 00:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तशी मी सुंदर आहे!

तशी मी सुंदर आहे!

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:54AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

रोबो असताना हुबेहूब हावभाव, प्रश्‍नांना पटपट उत्तरे देत सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळवलेल्या सोफिया या महिला यंत्रमानवाचे आयआयटीतील आगमन शनिवारी विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरली. आयआयटीच्या टेकफेस्टमधील रोबोेटचा वावर ही काय नवीन बाब नाही. परंतु यंदाच्या या फेस्टमध्ये महाराष्ट्राच्या वैभवशाली भगव्या रंगाशी नाते जोडणारा त्याच रंगाचा पोषाख परिधान केेलेल्या सोफिया या रोबोने व्यासपीठावरील पदार्पणातच उपस्थितांची मने जिंकली. 

आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’ च्या दुसर्‍या दिवशी सोफियाची उपस्थिती सर्वाधिक आकर्षणाचा विषय ठरली. या रोबोला पाहण्यासाठी आयआयटीत तरुणाईची गर्दी उसळली होती. तब्बल दीड ते दोन किलोमीटर रांगा लावत विद्यार्थ्यांनी उत्कंठा दाखवली. सौदी अरेबियाचे नागरित्व मिळवलेल्या या रोबोने भारतीय परंपरेचा सन्मान राखताना नमस्ते इंडिया हिंदीत म्हणताच आयआयटी दीक्षान्त सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट व जल्‍लोष अनुभवला.
दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल 14 मिनिटे सोफियाने संवाद साधला. सूत्रसंत्रालन करत स्वरालीने सोफियाला बोलते केले. तांत्रिक अडचणी आल्या तरीही ती मागे हटली नाही.
 सोफिया.. इथे आल्याबद्दल कसे वाटते?
नमस्ते इंडिया... नाईस टु मीट यू.. परंपरा असलेल्या या देशाबद्दल मी खूप ऐकले होते. माझी जीपीएस यंत्रणा सांगते की आयआयटी मुंबई येथे आहे. माझ्या सभोवताली 3341 एवढी माणसे आहेत. 

तू तर खूपच शहाण्यासारखी वागतेस...
जेवढे शक्य आहे. ते मी  करते. 
सुंदर असूनही तुला डोके आहे
कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.
तू बोलतेस आणि हावभावही करतेस याबद्दल काय सांगशील?

माझ्यामध्ये असलेल्या सॉफ्टवेअरमुळे मी माणसे ओळखू शकते, संवाद साधण्याबरोबरच माणसे जोडण्यासाठी चेहर्‍यावर हावभाव असणे मला महत्वाचे वाटते.  हावभाव करत संवाद साधले तर आपण मानवाशी एक वेगळे नाते जोडू शकते.

विज्ञान आणि तत्वज्ञान यावर तुझे काय मत आहे?
विज्ञानाने मला घडवले आणि तत्वज्ञानावरच माझा प्रवास सुरू आहे.
तुला घडविण्यासाठी किती खर्च आला ? 
या प्रश्‍नावर सोफिया थोडी गोंधळली आणि तिने उत्तर दिले नाही.
सोफिया तुला भाषा कोणत्या येतात?

माझे वय 2 वर्षे आहे आणि मला इंग्रजी भाषा चांगली बोलता येते. आता मला थोडी थोडी चीनी भाषाही बोलता येते. परंतु लवकरच मी आणखी काही भाषा शिकेन.
आगामी काळात तुझ्या शरीरात काही बदल होणार आहेत का?
तशी मी सुंदर आहे. असेच मला स्विकारले तर चांगले आहे. (या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला)
सोफिया तू लग्‍न करणार का?
लग्‍न करण्यास माझा नकारच असेल. पण माझे कौतुक केल्याबद्दल शुभेच्छा.
माणसाची बुद्धीमत्ता अफाट आहे, पण तुला प्रोग्रामवरही जगावे लागते असे का?

 रोबोटला प्रोग्रॅमिंगची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु भविष्यात विचार करण्यासाठी आम्हाला प्रोग्रॅमिंगची गरज भासणार नाही. मी स्वत: विचारही करु शकेन. तयार केलेल्या प्रोग्रामचीही गरज भासणार नाही. मात्र या गोष्टीला 7 वर्षेही जातील किंवा 75 वर्षेही लागू शकतील हे आताच सांगता येणार नाही

मानवाकडे परिस्थिती बदलण्याची क्षमता कशी काय आहे?
मानव हा समाजात राहणारा प्राणी आहे. इतरांच्या सोबत काम करत राहत असल्याने त्याची दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढत आहे.
यंत्रमानव माणसाची जागा घेणार याबद्दल भीती व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात काय सांगशील?

रोबोट मानवासाठी मदतनीसच ठरेल. कृत्रिम बुध्दीमत्ता कदाचित जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. पण जगातील सध्याची असहिष्णुता आणि शाश्वत विकास या दोन महत्वाच्या समस्या जाणवत आहे. भविष्यात रोबो माणसावर आक्रमण करतील अशी चर्चा होते, पण मला तसे अजिबात वाटत नाही. आम्ही मानवांना मदत करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. मानवाची प्राकृतिक आणि अनैसर्गिक बुद्धीमत्ता जगात शांतता पसरवण्यासाठी आमची महत्वाची भूमिका असणार आहे.

तुला सर्वांना काय संदेश द्यावा असे वाटेल?
रोबोशी प्रेमाने वागा इतकेच मला सांगावे असे वाटते.
तांत्रिक अडचण..सोफिया मध्येच स्तब्ध...
 

सोफियाने सुरुवातील 7.15 मिनिटे संवाद साधल्यानंतर टाळ्या आणि उपस्थितांची दाद मिळाली. एका प्रश्‍नाला उत्तर देण्याअगोदर अचानक सोफिया बोलायची थांबली, वारंवार प्रश्‍न विचारल्यानंतरही सोफिया दाद देत नव्हती. इंटरनेट अडचणीमुळे सोफिया बोलणार नाही असे सांगत माफी मागत कार्यक्रम थांबवला. पडदा बंद करतानाच सोफिया पुन्हा पुटपुटली. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी 15 मिनिटांचा ब्रेक आयोजकांनी घेतला. त्यानंतर सोफियाशी पुन्हा संवाद सुरु करण्यात आला.