Tue, Jul 23, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्रेड आणायला नकार दिल्याने मोठ्या भावाकडून लहानाची हत्या

ब्रेड आणायला नकार दिल्याने मोठ्या भावाकडून लहानाची हत्या

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 12:52AMमुंबई : प्रतिनिधी

रात्रीच्या जेवणावेळी ब्रेड आणायला नकार दिल्याने मोठ्या भावाने रागाच्या भरात गळा आवळून लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री माहीममध्ये घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन माहीम पोलिसांनी इम्रान सय्यद (26) या आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत. 

माहीम किल्ला कंपाऊंडमध्ये राहात असलेल्या सय्यद कुटूंबातील मोठा मुलगा इम्रान याचा त्याचाच लहान भाऊ इरफान (18) याच्यासोबत बुधवारी रात्री दिडच्या सुमारास जेवणासाठी ब्रेड आणण्यावरुन वाद झाला. एवढ्या रात्री बे्रेड कोठून आणणार, असा सवाल इरफान याने करताच इम्रान संतापला. दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात इम्रानने इरफानचा गळा दाबला. आई-वडील दोघा भावामधील भांडण सोडवेपर्यंत इरफान बेशुद्ध पडला होता. कुटूंबियांनी तात्काळ त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी इरफानला उपचारांपूर्वीच मृत घोषीत केले. 

रुग्णालय प्रशासनाकडून याची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इरफानचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालातही इरफानची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. तर इरफानच्या वडिलांनीही घडलेला घटनक्रम पोलिसांना सांगितला. अखेर पोलीस उपनिरीक्षक महेश नायकोडी यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करुन आरोपी भाऊ इम्रान विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिासांनी सांगितले.