Mon, May 27, 2019 00:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वयंपुनर्विकासाचा नारा फसला!

स्वयंपुनर्विकासाचा नारा फसला!

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 2:05AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना बिल्डर ऐवजी स्वयंपूर्ण विकास पॅटर्न आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला असून, मुंबईत कोणत्याही झोपडपट्टीचा ‘स्वयंपुनर्विकास’ होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. एसआरएमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपुनर्विकासासाठी एसआरएकडे एकही अर्ज आला नाही. म्हाडाने आपल्या वसाहतींसाठी वेगळा कक्ष स्थापन करूनही त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे  स्वयंपुनर्विकासाच्या नावाखाली रखडलेल्या विक्रोळी पार्क साईटसह सर्वच झोपु योजनांना एसआरएच्या विद्यमान योजनांशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे स्वयंपुनर्विकासाचे नारे देत प्रकल्प रखडवणारेही तोंडघशी पडले आहेत. 

झोपडपट्यांच्या गृहनिर्माण संस्थेमार्फत स्वयंपुनर्विकासासाठी एसआरएकडे एकही प्रस्ताव आलेला नसल्याच्या प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पुढारीला सांगितले. झोपडपट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी भांडवल उभारणे ही खूप कठीण बाब असल्याने गृहनिर्माण संस्था स्वयंविकासासाठी पुढे येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

झोपड्यांचा स्वयंपुनर्विकास केवळ अशक्य आहे. हे स्पष्ट करताना एसआरएचे उप मुख्यअभियंता आर. बी. मिटकर यांनी त्याची कारणे सांगितली ती अशी-

-झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी मुळात भांडवल उभारणे आवश्यक असते. मात्र, झोपडपट्टीतील रहिवाशांची  आर्थिक क्षमताच नसल्याने ते अशी भांडवल उभारणी करू शकत नाहीत ही सर्वात मोठी अडचण आहे. 

- आर्थिक क्षमताच कमी असल्याने कोणत्याही बँकेचे कर्ज झोपडपट्ट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी उपलब्ध होत नाही. 

- 33 (5) नुसार सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी काही बँका पुढे आल्या मात्र 33 (10) नुसार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी कर्ज दिलेच जात नाही. परिणामी, झोपडीधारकांना स्वबळावर तथा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी भांडवल उभारणे अशक्य होवून बसले आहे. 

- याचा परिणाम असा झाला की संपूर्ण मुंबईतून 33 (10) नुसार झोपड्यांचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी एकही प्रस्ताव एसआरएकडे आतापर्यंत आला नाही. 

याचा अर्थ स्वयंपुनर्विकासाचा नारा देवून रखडवण्यात आलेल्या विक्रोळी पार्कसाईटच्या एसआरएसाठीही असा अर्ज कुणी केला नाही. म्हणजे एकीकडे स्वयंपुनर्विकास करायचा म्हणून प्रकल्प रोखला आणि दुसरीकडे अशा पुनर्विकासासाठी अर्जही करायचा नाही. यातून संदीप येवलेंसारख्या कार्यकर्त्यांचे पितळ आता उघडे पडले.

विक्रोळी पार्कसाईटचे उदाहरण घ्यायचे येथील एसआरए योजना हनुमाननगर फेडरेशन विकास संघाच्या नावावर मंजूर झाली आहे. परंतु  स्वयंपुनर्विकास कार्यकर्ता संदिप येवले यांनी नव्याने पार्कसाईट स्वयंविकास संघर्ष समितीची स्थापना करून स्वबळावर झोपड्या हटवून टॉवर उभारण्याचा नारा दिला. एसआरएकडील नोंदीनुसार या समितीचाही अर्ज आलेला नाही. याचा अर्थ स्वयंपुनर्विकासाचे कोणतेही नियोजन या समितीकडे नाही. शिवाय अशा पुनर्विकासासाठी लागणारे आर्थिक बळ उभारण्यातही असे कार्यकर्ते कमी पडतात.झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांना कायद्याचे ज्ञान नाही आणि नसतील. त्यामुळे स्वयंपुनर्विकासाच्या नावाखाली या रहिवाशांची फसवणूक केली जात आहे. मुंबईत स्वयंविकासाच्या मार्गाने एकही एसआरए प्रकल्प पूर्णत्वाला गेलेला नसताना त्याचे दावे करणारे केवळ आपला स्वार्थ साधण्यामध्येच मश्गुल आहेत. आपल्या कारनाम्यांमुळे पूर्ण प्रकल्प रखडला जात आहे याकडे ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, अशी संतप्‍त भावना विक्रोळी पार्कसाईटचे एक भाडेकरू भास्कर लोकरे यांनी व्यक्‍त केली.