Sat, Apr 20, 2019 16:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ड्रेनेजलाईनच्या खड्ड्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू

ड्रेनेजलाईनच्या खड्ड्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:20AMठाणे  : प्रतिनिधी 

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कळव्यातील सायबा नगर परिसरातील दोन चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला. ठाणे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजलाईनसाठी खोदण्यात आलेल्या 6 ते 7  फूट खड्ड्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आनंद कैलासनाथ गुप्ता (6) नंदिनी कैलासनाथ गुप्ता (8) अशी या मृत झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. खड्ड्याच्या एका बाजूला बॅरिकेड लावण्यात आले नसल्याने या दोघांचा पडून मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मृत झालेल्या दोन्ही मुलांचे आईवडील अपंग असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

कळवा परिसरातील सायबा नगर परिसरातील पाईपलाईनजवळ कैलासनाथ गुप्ता (36) आणि त्यांच्या पत्नी सरस्वती गुप्ता (30) हे दोघे आपल्या चार मुलांसोबत राहतात. दोघेही आई-वडील पायाने अपंग असल्याने वडील भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. तर आई घरीच असते. शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान नंदिनी आणि आनंद हे दोघेही घराजवळचा ड्रेनेजसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याजवळ गेले. या खड्ड्याच्या तीन बाजूला बॅरिकेड होते मात्र एका बाजूला खड्डा पूर्णपणे मोकळा ठेवण्यात आला होता. दुपारची वेळ असल्याने फारशी वर्दळ देखील नव्हती. खड्ड्यात वाकून बघत असताना ज्या बाजूने बॅरिकेड नव्हते त्या बाजूने या दोघांचा अचानक तोल गेला आणि दोघेही खड्ड्यात पडले. खड्ड्यात पडल्यानंतर मोठा आवाज आल्यानंतर आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी धाव घेतली. मात्र खड्डा खोल असल्याने त्यांना वर काढण्यात 15 ते 20 मिनिटे गेली. यात त्यांच्या पाण्यात गुदमरुन मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. 15 मिनिटांनी या दोघांना बाहेर काढल्यानंतर त्यांना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . 

एक आठवड्यापूर्वी ड्रेनेजसाठी या ठिकाणी हा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या नसल्याने ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ही घटना घडल्यानंतर महापालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आला नव्हता.