Tue, Jul 23, 2019 10:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुचाकी अपघातात बहिण-भावाचा मृत्यू

दुचाकी अपघातात बहिण-भावाचा मृत्यू

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:01AMशहापूर : वार्ताहर

मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर-आसनगाव पुलाजवळ एका दुचाकीला टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत टँकरच्या चाकाखाली येऊन दोघा बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात मुलांचे आई-वडील जखमी झाले असून, त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन घरत (10), कामिनी घरत (14) अशी या भावंडांची नावे आहेत.  रक्षाबंधनाच्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

तालुक्यातील आवरे या गावातील प्रकाश घरत हे आपल्या दुचाकीने (एमएच 04 डीआर 6017) पत्नी व दोन मुलांसोबत मुंबई-नाशिक महामार्गावरून जात होते. आसनगाव उड्डाणपुलाजवळ मागून भरधाव वेगाने येणार्‍या एका अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश घरत व रेखा हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. तर टँकर अंगावरून गेल्याने दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी घरत पती-पत्नीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकरणी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर अपघात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे घडल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही संतप्त नागरिकांनी केली आहे.