Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एप्रिलपासून सायन उड्डाण पूल किमान सहा महिन्यांसाठी बंद!

एप्रिलपासून सायन उड्डाण पूल किमान सहा महिन्यांसाठी बंद!

Published On: Mar 13 2018 2:19AM | Last Updated: Mar 13 2018 2:16AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने सायन उड्डाण पुलाचे महत्त्व वादातीत आहे. मात्र, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हातात घेणार असल्याने हा पूल किमान सहा महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून या मार्गावरून वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीसारख्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.   
हा पूल बांधण्यासाठी 31 कोटी रुपयांचा खर्च येऊन तो वाहतुकीसाठी 2000मध्ये खुला झाला होता. हा पूल पूर्व भागातून मुंबईत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा असल्याने त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, आता या पुलाची डागडुजी करणे आवश्यक आहे. डागडुजीअंतर्गत या पुलाच्या 170 बेअरिंग्ज बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च येणार असून हे काम किमान सहा महिने चालणार आहे. साधारणतः 10 ते 15 एप्रिलपासून पुलाचे काम सुरू करण्याचा महामंडळाचा इरादा आहे. सदर कामाच्या निविदेचे(टेंडर) काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच ठेकेदाराची नियुक्ती होईल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पूर्व भागातून मुंबईत प्रवेश करण्याचे हे प्रवेशद्वारच आहे. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी व मुंबईबाहेर जाण्यासाठी हा उड्डाण पूल महत्त्वाची भूमिका बजावतो. साहजिकच हा उड्डाण पूल असल्याने तो बंद राहिल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यातही या पुलाचे काम सुरू राहणार असल्याने त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणीत वाढच होणार आहे. सदर पुलाची आयआयटीच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाकडून पाहणी करून घेण्यात आली असून त्यांच्या निष्कर्षानुसार पुलाच्या पायर्स व गर्डर्सची हालचाल नियंत्रित करणार्‍या बेअरिंग्जची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.तसेच प्रसरणाचे काम करणार्‍या जॉईंटसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोठा धोकाही उदभवू शकतो. हे टाळण्यासाठी पुलाची डागडुजी करणे आवश्यक आहे.

सध्या हा पूल वापरात असला तरी आजही येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने अमर महल जंक्शनवर एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे डागडुजीसाठी हा पूल बंद केल्यानंतर वाहतुकीचा बोजवारा उडण्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या समस्या कमी म्हणून की काय,एमएमआरडीएकडून ठाणे-वडाळा-कासारवडवली दरम्यान मेट्रो 4 चे काम एप्रिलमध्येच सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोसाठी पूर्व द्रुतगती मार्ग व लालबहाद्दूर शास्त्री मार्गावर अनेक ठिकाणी बॅरिकेडस उभे केले जाणार आहेत. शिवाय काही ठिकाणी वाहतूकही अन्यत्र वळवावी लागणार असल्याने वाहतुकीच्यादृष्टीने वाहनधारकांसाठी हेही मोठे संकट ठरणार आहे.