Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेस खरी लढत!

सायन पोटनिवडणुकीत शिवसेना-काँग्रेस खरी लढत!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई/धारावी : प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 मध्ये पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. येथे एका अपक्षासह 3 उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेना विरूद्ध अशीच रंगणार आहे. ही निवडणूक जिंकणे काँग्रेस व शिवसेनेसाठीही प्रतिष्ठेचे असल्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते प्रचारात उतरले आहेत. या जागेसाठी 6 एप्रिलला मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील बाळकृष्ण शेट्ये, शिवसेना रामदास देविदास कांबळे, अपक्ष उमेदवार गौतम यशवंत झेंडे या निवडणूक लढवत आहेत.

सायन प्रभाग 173 मधील शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात रामदास कांबळे व संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज शिवसेनेने भरले. एवढेच नाही तर, शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शिवसेनेने बंडखोरांची समजूत काढल्यानंतर अखेर रामदास कांबळे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यामुळे शिवसेनेची आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनिल शेट्ये यांच्याशी थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत गौतम झेंडे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. याठिकाणी गत महानगरपालिका निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात होते. पोटनिवडणुकीसाठी मात्र तिघेजणच लढत देत आहेत.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची फिल्डिंग

हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला. फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार तीन हजारांच्या फरकाने विजयी झाला तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी भाजप दुसर्‍या स्थानी होता. आता या प्रभागातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या अपक्ष उमेदवारास तिकीट दिले आहे. या निवडणुकीत भाजपा न उतरल्यामुळे ती शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे. तरीही शिवसेनेने विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या प्रभागाची जबाबदारी विभागप्रमुखांसह ज्येष्ठ नगरसेवकांवर सोपवली आहे. ही निवडणूक काँगेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्यासाठी तर शिवसेनेसाठी संख्याबळ जैसे थे ठेवण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे.

तटस्थांमुळे फायदा कुणाला?

शिवकोळीवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, पावसाळी नाले, संक्रमण शिबिरातील गैरसोयी या समस्यांच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. भाजप, रिपाइं (ए), शिवसेनेबरोबर तर पिपल रिपब्लिकन पार्टी, रिपाइं (गवई) यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तटस्थ राहिल्याने याचा फायदा नक्की कुणाला, अशी चर्चा आतापासूनच प्रभागात सुरू झाली आहे.

Tags : Sion Bypoll,  Shiv Sena, Congress


  •