Sun, Mar 24, 2019 10:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परवडणार्‍या घरांसाठी सिंगापूरची मदत

परवडणार्‍या घरांसाठी सिंगापूरची मदत

Published On: May 17 2018 2:21AM | Last Updated: May 17 2018 2:04AMमुंबई : प्रतिनिधी

देशातील प्रत्येकाला हक्काचे घर या संकल्पनेला गती देत राज्यात जास्तीत जास्त परवडणार्‍या घरांची निर्मिती व्हावी यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात काम करणार्‍या सिंगापूरमधील कंपन्यांची मदत राज्य सरकार घेणार आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील पायाभूत सुविधांची कामे तसेच पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी देखील सिंगापूरचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासंदर्भात सिंगापूरमधील कंपन्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी करार करण्यात आले. 

महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या मसुद्यावर फडणवीस तसेच सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली. 

पीएमआरडीए क्षेत्रात वर्ल्ड क्लास मास्टर-प्लॅनिंगसाठी सुर्बाना जुरांग आणि ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनल या सिंगापूरमधील कंपन्या सहकार्य करणार आहेत. यासंदर्भात पीएमआरडीए आणि एमएडीसी यांच्या वतीने करार करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटही यावेळी उपस्थित होते. 

ही संयुक्त समिती यापुढे नागरी पायाभूत सुविधा, विमान सेवा तसेच उद्योग क्षेत्रातील विकास क्षेत्रात काम करणार आहे. त्याबाबतचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. तसेच पीएमआरडीएच्यावतीने सुर्बाना जुरांग यांच्याशी करार करण्यात आला.

त्याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते यांनी मास्टर-प्लॅनचे सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली. तसेच ग्रीनफिल्ड एअरफिल्ड या पुरंदर विमानतळाच्या विकासाबाबत एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी सादरीकरण केले व करारावर स्वाक्षरी केली.